भंडारा : पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना ताजी असताना आज (दि.२८) सकाळी त्याच वाघाने खातखेडा येथे एका शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले असून वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. घटनास्थळी गेलेले सहाय्यक उपवनसंरक्षक यशवंत नागुलवार यांना संतप्त जमावाने मारहाण केल्याने ते जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ईश्वर सोमा मोटघरे (वय ५८, रा. खातखेडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आज सकाळी १० च्या सुमारास ईश्वर मोटघरे हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, खातखेडा येथील बसस्थानकाजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. ही माहिती गावकऱ्यांना मिळताच हजारो गावकरी घटनास्थळी दाखल झाले. वन विभाग व पोलिस विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
भंडारा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार हे घटनास्थळी गेले असता गावकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते. जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने सहाय्यक वनसंरक्षक नागुलवार यांच्यावर हल्ला करीत त्यांना जखमी केले. जखमी अवस्थेत नागुलवार यांना पवनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.