मुंबई : मुंबईत आज (दि.२३ जून) सकाळी काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात ढगाळ वातावरण असून, मान्सून आणखी गती पकडण्याच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान विदर्भातील काही भागात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच पुढच्या ३ ते ४ दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातील काही भागांमध्ये मान्सून आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल (Monsoon Forecast) होत आहे, अशी माहिती आयएमडी पुणे विभागाचे प्रमुख डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिली आहे.
अनेक भागात पावसाला सुरूवात
मुंबईत आज सकाळी काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर विदर्भातील काही भागात देखील मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबई, ठाणे, चंद्रपूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवलीमध्ये पावसान हजेरी लावली आहे. यानंतर रत्नागिरीतील काही भागात देखील पावसाला सुरूवात झाली आहे.
मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती
मान्सून सध्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, विदर्भचा काही भाग, छत्तीसगड, वायव्य बंगालचा उपसागराचा उर्वरित भाग, ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तरप्रदेशचा तोडा भागात आणि बिहारमधील आणखी काही भागात पुढे सरकला आहे. तसेच पुढील २ दिवसांत छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा काही भाग, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भात आजपासून जोरदार पाऊस
विदर्भातील काही भागात आजपासून मान्सूनने हजेरी लावली असून, मान्सूनला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. तर आजपासून(दि.२३ जून) पुढचे पाच दिवस संपूर्ण विदर्भाला जोरदार पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच विदर्भात २३ जून ते २७ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाची दाट शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.