अकोला,दि.३१ : यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित आहे. भरड धान्य सहज खाता येण्याजोग्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून लोहारा ता. बाळापूर येथील विदर्भ शेतकरी बचत गट यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेत बेकरी व्यवसायात प्रवेश केला आणि बाजरी, ज्वारी, नाचणी यांच्या बिस्कीट, कुकीज, ब्रेड सारखे उत्पादनांना सुरुवात केली. ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ घोषित केले आहे. एकीकडे जंकफुडचा आहारात वाढता समावेश. त्यामुळे स्थूलपणा ते विविध आजारांचा करावा लागणारा सामना. आहारातील पोषण मूल्याची झालेली कमतरता. या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे आहारात भरड धान्याचा समावेश. अनेकांना ह्याचे महत्व पटले असून त्यांनी आपल्या आहारात ज्वारी, बाजरी व नाचणी, अशा भरड धान्याचा समावेश सुरु केला आहे. पण हल्ली लोकांना ‘रेडी टू इट’ आणि ‘रेडी टू सर्व्ह’ प्रकारात पदार्थ हवे असतात. अशा पदार्थांचे पोषण-मूल्यवर्धित असणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कृषी विभागामार्फत लोहारा ता. बाळापूर येथील विदर्भ शेतकरी गटाला बेकरी उद्योग सुरु करण्यासाठी पाच लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. या कर्जाला ३५ टक्के अनुदानही आहे. या योजनेच्या लाभामुळे विदर्भ शेतकरी बचत गट यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी पासुन बिस्किटे, कुकीज आदी उत्पादने बनवली आहेत. ती विक्रीसाठीही उपलब्ध असतात. गेल्या डिसेंबर महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनात ज्वारी,बाजरी,नाचणी पासुन बनवलेली ग्राहकांचे आकर्षण ठरले होते.
गटाच्या अध्यक्ष श्रीमती सारा देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हे काम सुरु आहे. गावातच उत्पादीत झालेले भरड धान्य तेथेच प्रक्रिया करुन बेकरी उत्पादने बाजारात आणले जातात. ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने, ‘आत्मा’चे तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, कृषी विज्ञान केंद्राच्या किर्ती देशमुख यांचे तांत्रिक मार्गदर्शन गटाला मिळत असते. त्यांच्या या उपक्रमास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा वतीने उत्कृष्ट शेतकरी बचत गट म्हणून प्रमाणपत्रही मिळाले आहे.