नवी दिल्ली : देशातील २ हजारांच्या नोटांचे निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर मंगळवार, २३ मेपासून या नोटा बॅंकेमधून बदलून घेता येईल.दरम्यान, सध्या चलनात असलेल्या २ हजारांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे परत येतील, असे सांगत आवश्यकता वाटल्यास ३० सप्टेंबरची मुदत देखील वाढवली जावू शकते, असे संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज ( दि.२२) दिले. तसेच नोटबंदीनंतर नोटांची उणीव कमी करण्यासाठी काढण्यात आलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटाचा उद्देश पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला. ( Shaktikanta Das on ₹2,000 note ban )
नोट बदलून घेण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या सर्व तांत्रिक समस्यांना बॅंकेकडून संवेदनशीलपणे विचार केला जाईल. या नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या चलन व्यवस्थापन कार्याचा एक भाग असून तो स्वच्छ नोट धोरणाशी सुसंगत आहे. पुढील चार महिन्यांमध्ये कधीही या नोट बदलून घेता येणार असल्याने नागरिकांनी बॅंकांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन दास यावेळी केली.
Shaktikanta Das on ₹2,000 note ban : इतर मूल्यांच्या नोटांचा पुरेसा साठा
नोट बदलून घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली. एक विशिष्ट वेळ दिल्याशिवाय, प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही, असे सांगत बॅंकांकडे इतर मूल्यांच्या नोटांचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करत आवश्यकता वाटल्यास ३० सप्टेंबरची मुदत देखील वाढवली जावू शकते, असे संकेत दास यांनी दिले आहेत.
आर्थिक व्यवहारावर काेणताही परिणाम होणार नाही
अनेक लोक परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांना २ हजारांच्या नोटा अंतिम मुदतीत बदलू अथवा जमा करता येण्याची शक्यता कमी आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याचेही दास यांनी सांगितले. निश्चलनीकरणाचा आर्थिक व्यवहारावर कुठलाही परिणाम होणार नाही.आर्थिक व्यवहारासाठी २ हजारांची नोट कुठेही वापरली जात नाही, असे वैयक्तिक तसेच अनौपचारिक सर्वेक्षणाचा दाखला देत दास म्हणाले.