तेल्हारा : वाशिम शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील रहिवासी दिलीप लक्ष्मणराव माळेकर (४०) नामक रुग्णाला तेल्हारा येथील डॉ. डी. एन. राठी यांनी मणक्यात इंजेक्शन दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, चौकशीअंती डॉ. डी. एन. राठी यांच्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या फिर्यादीवरून १७ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा येथील गोमती नामक खासगी क्लिनीकमध्ये डॉ. डी. एन. राठी यांनी १६ मे २०२२ रोजी दिलीप लक्ष्मणराव माळेकर (रा. वाशिम) या रुग्णावर केलेल्या उपचारादरम्यान तो मरण पावला होता. रुग्णाचे प्रेत शवचिकित्सेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्याकडे पाठविण्यात आले होते. चौकशीत रुग्णावर चुकीचे
उपचार केले किंवा निष्काळजीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाला किंवा कसे? याबाबत अभिप्राय मिळविण्यास पाठवले असता शवचिकित्सा अहवाल, सी. ए. अहवाल, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय समितीचा अहवाल यावरून असे निष्पन्न झाले की आरोपी डॉ. डी.एन. राठी यांनी उपचार म्हणून रुग्णाच्या पाठीमागून मणक्यात इंजेक्शन दिले व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दवाखान्यातील ओपीडी रजिस्टर नष्ट केले किंवा लपवून ठेवले आहे, असे मर्ग चौकशीत निष्पन्न झाल्याचे व रुग्णाच्या मरणास कारणीभूत असल्याच्या आरोपावरून डॉ. द्वारकादास नारायणदास राठी यांच्याविरुद्ध १७ मे २०२३ रोजी तेल्हारा पो.स्टे. मध्ये भादंविच्या ३०४, २०१ कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणेदार ज्ञानोबा फड या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.