अकोला दि.२०:- जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर शुक्रवार दि.२४ ते रविवार दि.२६ दरम्यान महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन ‘तेजस्विनी’ चे आयोजन करण्यात आले आहे. अकोला शहरातील स्वराज भवन मैदानावर हे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने या प्रदर्शनात पाहणी व विक्रीसाठी उपलब्ध असतील.
जिल्ह्यातील सात तालुक्यातील ८० बचतगट यात सहभाग घेणार असून तीन दिवसांत या उत्पादनांच्या विक्रीतून १२ लाख रुपयांपर्यंतची उलाढाल अपेक्षित आहे. याशिवाय महिलांना उत्पादन, मार्केटिंग, व्यवसायाचे ज्ञान मिळावे यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. अकोला शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी केले आहे.