अकोला दि.16 :- अवैध सावकारी प्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या कारवाई संदर्भात जप्त करण्यात आलेल्या तारण मालमत्तेबाबत संबंधित मालमत्ताधारक वा त्यांच्या वारसांकडून दावे मागविण्यात आले आहेत. याबाबत ३१ मार्च २०२३ मुदत देण्यात आली असून त्यानंतर आलेल्या दाव्यांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विनायक कहाळेकर यांनी कळविले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला या कार्यालयाने दि.२८ डिसेंबर २०१८ रोजी अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध धाडसत्र राबविले होते. त्यात वैध अनुज्ञप्तीशिवाय श्रीमती मिरा दयाराम फुलवाणी व अन्य पाच जण रा. गुरुनानक नगर , निमवाडी अकोला हे सावकारी करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यात काही मालमत्ता ताबेगहाण ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ज्या कर्जदारांनी श्रीमती फुलवाणी यांच्याकडे ही मालमत्ता ताबेगहाण ठेवली होती त्यांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे आवश्यक त्या लेखी पुराव्यासह आपला लेखी दावा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ‘सहकार संकूल’ आदर्श कॉलनी, अकोला येथे दि.३१ मार्च २०२३ पूर्वी सादर करावे. मुदतीनंतर आलेल्या दाव्यांचा विचार केला जाणार नाही,असे जिल्हा उपनिबंधक तथा सावकारांचे जिल्हा निबंधक विनायक कहाळेकर यांनी कळविले आहे.