Budget 2023 : नवीन कर प्रणालीमध्ये वैयक्तिक आयकरात ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत. आयकर सूट मर्यादा आता ७ लाखापर्यंत केली आहे. तर ३ लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget 2023 Personal income-tax)
५ स्लॅबमध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. तसेच ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर असेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
२०२० मध्ये केंद्र सरकराने नवी ऐच्छिक इनकम टॅक्स योजना जाहीर केली होती. कर भरणा सुटसुटीत व्हावा या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आली होती. यामध्ये इनकम टॅक्सचे ६ नवीन स्लॅब करण्यात आले आणि स्लॅबनुसार इनकम टॅक्सचे दर कमी करण्यात आले. पण गृहकर्ज आणि विमा यांची इनकटॅक्सची सवलतची तरतुद या योजनेत नसल्याने अनेकांनी याकडे पाठ फिरवली होती.
२०२० ला लागू केलेल्या योजनेनुसार कपातीशिवाय (without deductions) इनकमटॅक्सचे सहा स्लॅब आहेत. ५ टक्के (२.५ लाख ते ५ लाख), १० टक्के (५ लाख ते ७.५ लाख), १५ टक्के (७.५ लाख ते १० लाख), २० टक्के (१० लाख ते १२ लाख), २५ टक्के (१२.५ लाख ते १५ लाख) आणि ३० टक्के (१५ लाखांपुढे) असे हे स्लॅब आहेत. तर कपातीसह (With Deduction) इनकम टॅक्सचे 5 टक्के, २० टक्के आणि ३० टक्के असे तीन स्लॅब आहेत. कोणत्या प्रकारे इनकम टॅक्स आकारला जावा, हे करदात्यांनी स्वतः ठरवायचे असते.