परीक्षेला हिजाब (Hijab) घालून बसण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका कर्नाटकातील विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केली असून, ६ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार असल्याने त्यावर लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
कर्नाटकातील काही विद्यार्थिनींनी ही याचिका दाखल केली असून, वकील मीनाक्षी अरोरा यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही याचिका लवकर सुनावणीला घेण्याची विनंती केली. त्यावर सरन्यायाधीशांनी या याचिकेसाठी तीन न्यायमूर्तीचे खंडपीठ स्थापन करण्याबाबत विचार करून लवकरच तारीख जाहीर करू, असे सांगितले. कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शासकीय संस्थांत हिजाबवर बंदी घातली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकील मीनाक्षी अरोरा म्हणाल्या की, सरकारच्या आदेशानंतर बहुतेक मुस्लिम विद्यार्थिनींनी खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेतले आहेत; पण त्यांच्या परीक्षांचे केंद्र शासकीय शिक्षण संस्थांत येत असल्याने याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार असल्याने याचिका लवकर सुनावणीला घ्यावी, अशीही मागणी केली.