कोरोनाच्या (Covid) पार्श्वभूमीवर सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला. दुसरीकडे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि बूस्टर डोस याबाबत जागरुकता वाढवण्यावर भर दिला. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवण्यासंबंधी जागरुकता नागरिकांमध्ये आणण्याची गरज आहे. शिवाय बूस्टर डोसचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले.
पंतप्रधानांनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यात कोरोनाच्या संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, गृहमंत्री अमित शहा, नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चीनमध्ये थैमान घालणार्या कोरोनाच्या बीएफ 7 या विषाणूचे चार रुग्ण भारतात आढळले असल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली.
राज्याराज्यांत खबरदारी
केंद्राने बुधवारी सर्व राज्यांना पत्र पाठवल्यानंतर राज्य सरकारांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांत आरोग्य यंत्रणांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकात विमानतळांवर रॅन्डम चाचण्या घेण्यास सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान, मंत्री मास्क घालून सभागृहात
कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर अनेक मंत्री मास्क घालून आले. यावेळी त्यांनी खासदारांना मास्क घालण्याचे आवाहन केले.