ऋतुमानाप्रमाणे पक्षी वर्षभर नियमित स्थलांतर करतात. स्थलांतराच्या दरम्यान त्यांना योग्य मार्ग कसा शोधतात? हा आपल्या साठी न सुटलेला विषय असला तरी पक्ष्याच्या जिवनातील एक नियमीत आणि न चुकता घडणारी प्रक्रिया आहे. सर्व पक्षी स्थलांतर करतातच असे नाही. काही पक्षी स्थलांतर करतात, तर उरलेले काही आपल्या प्रदेशात राहुन तात्पुरते स्थलांतर करत परिस्थितीशी मिळवुन घेतात. स्थलांतराच्या दरम्यान त्यांना बऱ्याच प्रकारचे अडथळे व धोके येतात, पण ते पत्करुन इतर कष्ट सहन करत हे पक्षी स्थलांतर करत असतात. त्याचे हे स्थलांतर जितके त्यांच्यासाठी आवश्यक आहे तितकेच निसर्गासाठी ही आवश्यक आहे.
आपल्याकडे स्थलांतर करुन येणारे पक्षी हे उत्तर ध्रुव, हिमालय, वाळवंट, महासागर पार करत युरोप, आशिया, सायबेरीया कडुन दहा-बारा हजार किमी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या पक्ष्यांसोबत इतर पक्षी सुद्धा पुर्वेकडून पश्चिमेस व पश्चिमेकडून पुर्वेकडे जवळ जवळ अक्षांशावर व सारख्याच हवामानाच्या प्रदेशात लहान लहान स्थलांतर करताना दिसतात.
स्थलांतर करताना वातावरणातील बदल व सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत अन्नाने समृद्ध तसेच जगण्यासाठी लागणाऱ्या इतर घटकांनी परिपूर्ण ठिकाणी शोधून विश्रांती घेत ठराविक मार्गाने आपल्या पारंपरिक ठिकाणी मुक्कामी पोहचतात. स्थलांतर करताना बहुतांश पक्षी थव्याने एकत्र प्रवास करतात. पण त्याच बरोबर एकट्याने प्रवास करणारे पण पक्षी अगदी थोड्या प्रमाणात आहे.
विणीच्या हंगामात स्थलांतर करुन आपल्याकडे येणारे नवरंग, निळ्या टोपीचा कस्तूर, पर्ण वटवट्या आणि निळा दयाळ हे त्याच प्रमाणे वटवट्यांच्या, तौर चिमण्यांच्या आणि धोबी पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा समावेश होतो. दक्षिण भारत तांबड्या, डोक्याचा भारीट व काळ्या डोक्याचा भारीट (Bunting) , (Bee-eater) वेडा राघू इतर काही पक्षी हे हिवाळ्यात पाहुणे.
तसेच उत्तर ध्रुवाकडून येणाऱ्या (Godwit) मालगुजा (Greater snip) पाणलवा , (Flamengo) रोहीत , (Goose) हंस सारखे लहान – मोठे इतर पक्षी दक्षिणेकडे विणीचा हंगाम नसतानाही कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी घरा पासुन लांब ऊबदार प्रदेशाकडे स्थलांतर करताना दिसतात. आपल्या कडे येणारे बहुतेक पक्षी बहुतेक हिवाळ्यात येतात बदके, चिखलपायटे, कुरव’नदीसुरय व इतर जलपक्ष्याची संख्या जास्त आहे. हिवाळा संपायला लागला की पक्षी स्थलांतरित ठिकाणाहून आपल्या निवासाकडे परत जातात.
काही पक्षी वातावरणातील बदलांमुळे कमी अंतराचे स्थलांतर करतात. गावाकडून झाडे असलेल्या भागात व उन्हाळ्यात दाट झाडीचा सहारा घेतात तर पावसाळ्यात डोंगरावरून पायथ्याला येऊन निवास करतात. बऱ्याचदा अन्नाच्या कमतरतेमुळे काही पक्षी अनियमित स्थानिक स्थलांतर करतात. एका ठिकाणचा अन्नसाठा संपायला लागला की ते जवळच दुसऱ्या अन्नाच्या ठिकाणी स्थलांतर करतात.
अती प्रमाणात मासेमारी, जाळे लावून पक्ष्यांची शिकार, किटकनाशकांचा वापर तसेच इमारतीच्या लाकडासाठी मोठी झाडे, सरपणासाठी होणारी लाकूडतोड व गुरचराईमुळेही स्थलांतर करणारेच नाही तर स्थानिक पक्ष्याचेही अधिवास संकटात सापडत आहेत. त्यामुळे बऱ्याच पक्षाच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या व आपल्या पुढील भवितव्यासाठी पक्षांसोबत वृक्षांचे पण संवर्धन करणे जरुरीचे आहे.
-देवेंद्र तेलकर, अकोला.
लेखकःवन्यजीव अभ्यासक आहेत.