अकोला,दि.७ :- अवकाळी पाऊस, गारपीट वा अन्य कोणत्याही कारणाने संत्रा, मोसंबी सारखी फळे गळून पडतात आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातो. अशा वेळी या संत्रासालीचा मुरघास तयार करुन तो शेळ्यांच्या आहारात अपारंपारिक पूरकखाद्य वा पर्यायी खाद्य म्हणून वापरात आणलं तर? हाच विचार घेऊन येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात सध्या प्रयोग सुरु आहे. या प्रयोगाचे फलित म्हणजे संत्रा उत्पादक आणि शेळीपालक यांच्या फायद्याची गोष्ट ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलाय.
विदर्भात संत्रा, मोसंबीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र अनेकदा शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक कारणांनी नुकसानीला तोंड द्यावे लागते. गळून पडणारी फळे, वादळ, अति व अवकाळी वृष्टी, गारपीट अशी अनेक कारणे त्यामागे असतात. मात्र अशा वाया जाणाऱ्या फळांना फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र ही फळे फेकून न देता त्याचा वापर पूरक पशुखाद्य म्हणून केला तर? याकडे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले.
सद्यस्थितीत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात हा प्रयोग पशुउत्पादन व व्यवस्थापन विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. गिरीश पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अर्चना एन. ही विद्यार्थिनी करीत आहे. या प्रयोगाबाबत डॉ. पंचभाई यांनी माहिती दिली. संत्रा, मोसंबी यासारखी फळे वा त्याचे साल पशु थेट जास्त प्रमाणात खात नाहीत असे दिसून येते. त्याचे कारण या फळांमध्ये असणारा आंबटपणा, शर्करेचे प्रमाण इ. मात्र अपारंपारिक खाद्य म्हणून त्याचा वापर करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. म्हणूनच मुरघास तंत्राने संत्रा साल मुरवून त्याचा खाद्यात समावेश करण्याबाबत प्रयोग होत आहे. प्रयोगाच्या प्रारंभीक अवस्थेत अशा मुरवलेल्या संत्रा सालीस शेळ्यांनी पसंती दर्शविली आहे. त्यांना हे खाद्य आवडल्याचे दिसून आले आहे.विशेष म्हणजे हा प्रयोग वऱ्हाडी या स्थानिक जातीच्या शेळ्यांवरच करण्यात येत आहे.
असा आहे प्रयोग
शेळीला लागणाऱ्या खाद्याच्या प्रमाणात अनुक्रमे २५ टक्के, ५० टक्के संत्रा मुरघास समाविष्ट करुन त्यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यात येत आहे. यासाठी संक्रमण काळातील म्हणजेच विण्याच्या तीन आठवड्याच्या आधी व तीन आठवडे नंतर अशा अवस्थेतील व त्याही वऱ्हाडी शेळ्यांच्या तीन गटांत समावेश करण्यात आलाय. पहिल्या गटाला पारंपारिक मका मूरघास दिला जात आहे. दुसऱ्या गटाला २५ टक्के तर तिसऱ्या गटाला ५० टक्के संत्रासाल मुरघास दिला जात आहे. या सर्व शेळ्या विण्याच्या अवस्थेतील आहेत. कारण विण्याच्या आधी व नंतर शेळीच्या शरिरावर खूप ताण असतो. त्यामुळे तिची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते व ती विविध आजारांना बळी पडण्याचा संभव अधिक असतो. अशा वेळी तिला पोषक अन्न घटकांची अधिक आवश्यकता असते. तसेच शेळीच्या वितानंतर तिचे दुग्धोत्पादन वाढणे व करडांचे पोषणाचा ताणही तिच्यावर असतो. या सर्व अवस्थांमध्ये या घटकाचा समावेश आहारात केल्यानंतर होणारे बदल यात अभ्यासले जाणार आहे.
प्रयोगाच्या सद्यस्थितीत शेळ्यांना हा चारा आवडलेला आहे. चारा खाल्ल्यानंतर पहिल्या काही दिवसांत या अन्नाचे पचन चांगले झालेले दिसले. शेळीच्या विष्ठेत काही बदल दिसून आलेला नाही.
अन्य दुधाळ जनावरांसाठीही उपयुक्त
हा प्रयोग यशस्वी झाल्यास याच खाद्याचा समावेश अन्य म्हणजे म्हैस, गाय या सारख्या दुधाळ जनावरांकरिता करता येईल. त्यादृष्टीनेही हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे वाया जाणारे संत्रा, मोसंबीसारखी फळे व दुसरीकडे महागणारी चारा पिके, पशुखाद्य इ. यांची सांगड घालून दोन्ही घटकांना त्याचा फायदा होईल,असा विश्वास डॉ. गिरीश पंचभाई यांनी व्यक्त केला.
शेळीच्या खाद्याचे प्रमाणः शेळीला दिवसाकाठी तीन ते पाच किलो हिरवाचारा, अर्धा किलो सुका चारा, तर २०० ते २५९ ग्रॅम पशुखाद्य अशी आहाराची गरज असते.
‘संत्रासाल मुरघास’ मध्ये असणारे अन्न घटक
संत्रा सालीच्या मुरघास मध्ये क्रुड फायबर-२० ते २२टक्के, क्रूड प्रोटीन ७ ते ८ टक्के, विद्राव्य साखर १० ते १२ टक्के, अन्य आवश्यक तैलद्रव्य, ॲण्टीऑक्सिडन्ट्स, कॅरॅटिनॉईड, जिरॉऑनाईड असे पोषक घटक असतात. यांचा आहारात समावेश झाल्याने शेळीची रोगप्रतिकारक शक्ती, दुग्धोत्पादन व वजन वाढेल असे शास्त्रज्ञांचे अनुमान आहे. या आहाराचा परिणाम अभ्यासण्यासाठी शेळ्यांची नियमित तपासण्या, रक्ताच्या चाचण्या केल्या जाणार आहेत, असे डॉ. पंचभाई यांनी सांगितले.
मुरघास बनविण्याची प्रक्रिया
संत्रा सालीचा मुरघास करण्यासाठी संत्रा वा मोसंबीच्या फळांची साल काढावी. आपल्या आवश्यकतेनुसार ५०, १०० ते ५०० किलो क्षमतेच्या थैल्यांमध्ये त्या दाबून भराव्या. त्यात १ लिटर पाण्यात ५० ग्रॅम गुळ हे मिश्रण टाकावे व एका क्विंटलला २ ग्रॅम प्रोबायोटिक मिक्श्चर टाकावे. संत्रा साल भरतांना त्यात हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी. मध्ये एखादा कुटाराचा थर द्यावा. पूर्णथैली हवाबंद करावी. २१ दिवसांत हे मूरघास जनावरांना खाण्यायोग्य होते,असे डॉ. पंचभाई यांनी सांगितले.