अकोला, दि.4 :- अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झाला असून क्षेत्रनिहाय सहायक मतदार नोंदणीअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयानी पुढाकार घेऊन आपल्या आस्थापनावरील शिक्षक तसेच पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे दि. ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी ऑनलाईन बैठकीत केले.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाची ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी निवडणूक विभागाचे मुकेश चव्हाण, ऑनलाईन बैठकीव्दारे, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आदि उपस्थित होते.
महाविद्यालयातील दि. १ नोव्हेंबर २०१९ पूर्वी पदवी पूर्ण केलेले पदवीधारक तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मतदार नोंदणी प्राधान्याने करुन घ्यावी. नोंदणीकृत मतदारांची यादी महाविद्यालयाच्या मान्यतेने निवडणूक विभागाकडे सादर करावी. शिक्षण विभागाने शासकीय, निम शासकीय व खाजगी महाविद्यालय स्तरावर पदवीधर नोंदणी मोहिम राबवावी. तसेच शासकीय, निम शासकीय व खाजगी महाविद्यालयात पदवीधर नोंदणी झाली असल्याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी, असे सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.