मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (bacchu Kadu) आणि भाजपशी जवळीक असलेले आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत आहेत. (Ravi Rana)रवी राणा आणि बच्चू कडू यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. यानंतर रविवारी रात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर राजकीय खलबतं सुरु होती. जवळपास अडीच तास वर्षा बंगल्यावर बैठक सुरु होती.
या बैठकीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा आपापल्या तलवारी म्यान करतील, असे सांगितले जात आहे. या दोन्ही नेत्यांकडून आज पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली जाईल आणि या वादाला विराम दिला जाईल, असे समजते. त्यामुळे आता रवी राणा आणि बच्चू कडू नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. हे वक्तव्य रवी राणा मागे घेणार, हेदेखील पाहावे लागेल. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोन्ही नेते सोमवारी सकाळी ९ वाजता ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. रवी राणा यांच्या आरोपांनंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारची साथ सोडण्याचे संकेत दिले होते. तसेच आपले कार्यकर्तेही, ‘तोडफोड करून सत्तेतून बाहेर पडा’, या मताचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या मनधरणीसाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांना मुंबईला बोलावण्यात आले होते.
बच्चू कडूंची नाराजी लवकरच दूर होणार, मंत्रिमंडळ विस्तार दृष्टीपथात?
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या विस्तारानंतर उरलेल्या मंत्रिपदांचे शिंदे गट आणि भाजपमध्ये समसमान वाट होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. बच्चू कडू यांच्यासह शिंदे गटातील मंत्रिपद न मिळालेले आमदार सध्या अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्तार शक्य तितक्या लवकर करण्याचे प्रयत्न केले जातील.