रंग हि सृष्टी निर्मीत बाब आहे. इंद्रधनुष्याच्या रंगीत छटा जशा मनाला प्रफुल्लीत करतात, फुलपाखरू बघितल्यानंतर रंगाची संगती ईश्वराने एवढ्याशा छोट्या जीवावर कशी रंगवली असेल याची कल्पना भन्नाट करून सोडणारी आहे. आयुष्यात रंगाचं महत्त्व किती हे फक्त दृष्टीहीन दिव्यांगांना आणि ज्यांची रंगांची दुकाने आहेत त्यांनाच खरंतर सांगता येईल.
आजचा हा लेखन विषय नवरात्रीच्या नऊ दिवस स्त्रियांनी नऊ रंगाचे वस्त्र परिधान का करावे या विषयावर ज्यांचा आक्षेप आहे त्यांच्यासाठी लिहितो आहे. मित्रीनींनो मित्रांनो खरंतर कुणी कधी काय कसे कुठे घालावे अर्थात परिधान करावे याचे स्वातंत्र्य मुळातच घटनेने दिले आहे. त्यामुळे या विषयावर वाद घालणे पूर्णतः चुकीचे आहे. तरीसुद्धा काही तथाकथित महिला उद्धारक आणि तथाकथित स्त्रीवादी विचारांच्या स्वयंघोषित महिला प्रवक्त्या जेव्हा माध्यमांवर आणि सामाजिक माध्यमांवर नवरंग परिधान करणाऱ्या महिलांना ज्ञानाचे डोज पाजण्याचा केविलवाणा प्रयत्न करून त्यांच्यावर टीका करतात. तेव्हा माझ्यासारख्या स्त्रीवादी लेखकाने आपली लेखणी न झिजवणे म्हणजे स्त्रीवादातील एक बाजू हेतू पुरस्पर दळवून ठेवण्याचे षडयंत्र करण्यासारखे होय.
देशातील सर्वच जाती-धर्मांमध्ये गरीब स्त्रिया आहेत हे कोणीही नकारु शकत नाही किंवा नाकारूही नये. त्या स्त्रियांना दोन वेळ पूर्ण पोट जेवण मिळत नाही आणि अंगावर कपडेही मिळत नाहीत या वास्तवाशी मी समरस आहे. समाजात काही स्त्रियांची अवस्था बिकट आहे यात दुमत नाही पण म्हणून आपण ज्या स्त्रियांना उत्सव साजरा करायचा आहे त्यांना आडकाठी घालून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे हे सुद्धा तितकेच चुकीचे आहे. माझे घर झोपडीचे आहे म्हणून तुमच्या महालाला मी आग लावावी हे जितके चुकीचे आहे तितकेच श्रीमंत महिला नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या कशा परिधान करतात आणि त्या आनंद कशा साजरा करतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हेही चुकीचे आहे.
तुम्ही जर गरीब महिलांविषयी कळवळा ठेवत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करता हे तुमच्या कृतीतून समोर येऊ द्या. त्या गरीब महिलांसाठी तुम्ही वर्षभर सोडा पण केवळ नऊ दिवसात किती मदत केली? याची खातरजमा करा आणि मगच उर्वरित स्त्रियांवर टीका करा. केवळ गुगल वरून गरीब महिलांचे फोटो डाऊनलोड करून त्या किती बापुड्या आहेत आणि आमच्या आजूबाजूला असणाऱ्या नववस्त्र नवरंगात परिधान करणाऱ्या महिला किती माजोड्या आहेत याचे आभासी चित्र प्रसारित करून स्वतः किती प्रगल्भ विचाराच्या समाजसेवी महिला आहोत, याचा वांजोटा उठारेटा करणेही लज्जास्पद आहे. ज्या गरीब महिलांसाठी आपण तथाकथित उद्धारक म्हणून पोस्ट करता तेव्हा स्वतःचा चेहरा आणि पेहेराव बराच काही विरोधाभास आपले सत्य नागडा करून समोर आणतो. आपल्या चेहऱ्यावर केलेला मेकअप आणि घातलेली साडी याचा अंदाजी किमान पाच ते सात हजाराचा खर्च सहज असेल. मग असे डीपी, स्टेटस आणि प्रोफाइल साठी छायाचित्र काढून गरीब महिलांच्या विषयी गळा काढायचा आणि त्याच गळ्यातून मध्यमवर्गीय, सामान्य आणि श्रीमंत महिलांच्या नऊ दिवसातील नऊ साड्यांच्या रंगाच्या संगती विषयी गरळ ओकायची हि पाहिजे तितकी साजेशी बाब नाही हे शेंबड्या मुलीलाही कळते.
स्वतःची रेघ मोठी करायची असेल तर त्यासाठी खस्ता खाव्या लागतात. गरिबांसाठी बोलघेवडे विषय माध्यमांवर मांडून उसना आव अर्थात उसने अवसान आणता येत नाही. त्यासाठी दुसऱ्याची रेघ तेवढीच ठेवून स्वतःची रेघ त्यापेक्षा मोठी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत असायला हवे,असे प्रत्येक प्रामाणिक व्यक्तींची मतं आहेत. नऊ दिवसात महिलांना जो आनंद मिळतो, तो त्यांना घेऊ द्या. त्यांच्या भावांनी, वडिलांनी, पतींनी, बहिणींनी त्यांना त्या साड्या किंवा ड्रेस घेऊन दिले आहेत तुम्ही नाही. त्या सुंदरपणे परिधान करून स्वतःचा आनंद व्यक्त करतात आणि त्यात असामाजिक असे काहीच नाही. त्या साड्यांचा त्रास समाजामध्ये इतर कुणाला का व्हावा ? हाच यक्ष प्रश्न आहे. त्यांना जे साधत आहे ते त्या करीत आहेत पण तुम्हाला ते का बांधत आहे हे म्हणजे तुमच्या एककली कोत्या मनाचं कलुषित प्रतिबिंब आहे, हे अधोरेखित करून जाते.
नऊ दिवसांच्या नऊ साड्यांपासून तर ड्रेस पर्यंत हा सर्व व्यवसायाचा फंडा आहे आणि तो फंडा दैनिक लोकमतने आणला आहे असेही माध्यमांवर बघायला मिळते. नऊ दिवस कोणते वस्त्र घालावे हा जर व्यावसायिक फंडा असेल तर त्यातून व्यावसायिक भरभराटीच येणार आहे. साड्या खरेदी, ड्रेस मटेरियल खरेदी करणे, ब्लाऊज शिवणे यामधे होत असलेली सर्व आर्थिक उलाढाल हि ड्रेस शिवणाऱ्यांपासू…
देशातील जास्तीत जास्त महिलांनी दरवर्षी चांगले कपडे परिधान करायला हवे, त्यांनी पौष्टिक आहार घ्यायला हवा, त्यांनी उत्तम दर्जाची पुस्तके वाचायला हवी, जास्तीत जास्त गरीब महिलांचा स्तर उंचावला जावा, अधिकाधिक महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्हाव्या, पुरुषी मानसिकतेतून बाजूला सारून महिलांनी आपल्या विचारांची आरास मांडत आपल्या संकल्पची घटस्थापना करून सर्वच क्षेत्रात आपल्या अष्टभुजांच्या कल्पकतेने आयुष्याच्या काळोख्या रात्रींना नवरात्रीत परिवर्तित करण्यासाठी सज्ज व्हावे. जीवनातील सुखाच्या क्षणांच्या टिपऱ्या करित आपल्या आप्तेष्टांसोबत सुखाचा दांडिया खेळावा आणि आपल्या कर्तुत्वाच्या पोशाखात अर्थात पोलीस, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, शेतकरी, वनरक्षक, पत्रकार या सारख्या नववीध पोशाखात दररोज सहकाऱ्यांशी टाळी देत गरबा रंगवावा, असे आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांना महिलांविषयी जेव्हा वाटायला लागेल तेव्हाच बोलघेवडेपणा सोडून आपण स्त्री उद्धारासाठी खारीचा वाटा उचलला, याचे प्रमाण समाजच देईल. त्याचा कोणताही खोटा बडेजाव करण्याची गरज पडणार नाही. नवरंगातील या सर्व महिलांना स्त्री जागराच्या आणि स्त्रीवादाच्या नवविचाराची प्रेरणा आई जगदंबा देवो, हीच या प्रसंगी शुभकामना करित एकमेकींवर जळण्यापेक्षा एकमेकीनी उपेक्षीत महिलांना परिस्थितीशी लढण्यासाठी पुढाकार घ्यावा, म्हणजे सर्वत्र बारोमास रंगीत नवरात्र होईल, ही मनोकामना।
संजय कमल अशोक
पत्रकार तथा समाजसेवक
अकोला, महाराष्ट्र
७३७८३३६६९९