अकोला,दि. 26: सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबवित आहे. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा लाभ नागरिकांपर्यत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबधित विभागाना दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात सेवा पंधरवाडा मोहिमेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, कामगार आयुक्त राजू गुल्हाने, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, दुरदृष्य प्रणालीव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, सर्व उपविभागीय अधिकारी, मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, केंद्र व राज्य शासनाव्दारे राबवित असलेल्या विविध योजनाचा लाभ नागरिकांपर्यत पोहोचवा. विशेषत: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजनाचा गरिब व गरजूना लाभ मिळवून द्या. याकरीता जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबवा. पॅनलवर असलेल्या हॉस्पीटल स्थळी शिबीरांचे आयोजन करा. तसेच मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागाव्दारे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा नागरिकांना मिळेल याकरीता नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.