अकोला, दि. 20 : गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरांमधील लम्पि त्वचा रोग या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी अबाधित जनावरांना द्यावयाच्या लसीच्या २ लाख ८८ हजार मात्रा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या असून लसीकरणाचे काम वेगात सुरु आहे. आतापर्यंत ८७ हजार ५८४ जनावरांना लसीकरण करण्यात आले असून उर्वरीत जनावरांचे लसीकरण वेगात करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
लम्पि त्वचारोग या प्राण्यांमधील आजाराबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. याबैठकीस विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी.एम. दळवी डॉ. बाळकृष्ण धुळे, डॉ. देशमुख, डॉ. सोनवणे आदी उपस्थित होते. याबैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ज्या गावांत लम्पि त्वचा रोग बाधीत जनावरे आढळली अशा गावांतील जनावरांची संख्या ४७ हजार २६४ इतकी आहे. प्रत्यक्षात बाधीत जनावरे १४७६ आहेत. बाधीत जनावरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी त्रिज्येच्या परिसरात ३४३ गावे आहेत. याच पाच किमी त्रिज्या परिसरात येणाऱ्या जनावरांची संख्या १ लाख १३ हजार ३९८ इतकी आहे. त्यापैकी ८७ हजार ५८४ जनावरांचे लसीकरण झाले आहे. बाधीत जनावरांपैकी ४२९ जनावरे उपचारांनंतर बरी झाली तर ४६ जनावरे दगावली आहेत. सद्यस्थितीत १००१ सक्रिय पशुरुग्ण आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आ. अमोल मिटकरी यांनी सुचना केल्या की, दगावलेल्या जनावरांच्या मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे पालन व्हावे. ही विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनेच लावण्यात यावी. जिल्ह्यात जी जनावरे दगावली त्या पशुपालकांना द्यावयाच्या मदतीबाबत तात्काळ उपाययोजना कराव्या. दुधाच्या सेवनाबाबत जनतेच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी. जनावरांचे मृत्यूचे प्रमाण खाली आणण्यासाठी प्रयत्न करावे. शहरी भागातील जनावरांच्या लसीकरणालाही गती द्यावी.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, लसीकरणाचे डोसेस पूर्ण प्राप्त झाले असल्याने लसीकरणाची गती वाढावी यासाठी ९९ खाजगी पशुवैद्यक व अन्य मनुष्यबळाची उपलब्धता केली आहे. लवकरच जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे. आजारी जनावरांना तात्काळ उपचार उपलब्ध करुन द्यावे,असेही निर्देश त्यांनी दिले.