कोल्हापूर : Laser Show : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला लेसर शो चिंतेचे कारण बनला आहे. गणेशोत्सव काळात शहरात डोळ्यांचे आजार वाढल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा नेत्र संघटनेच्या माहितीनुसार गेल्या बारा दिवसांत 63 जणांच्या डोळ्याला लेसर शोमुळे इजा पोहोचली आहे.
यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लेसर शोचा झगमगाट होता. येत्या काही दिवसांत लेसर शोमुळे इजा झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतितीव्र क्षमतेच्या लेसरचा वापर टाळणे योग्यच आहे. सण, उत्सव, विवाह सोहळा किंवा अन्य मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टिमसोबत लेसर शोचे फॅड तरुणाईमध्ये आहे.
मिरवणुका आकर्षक बनवण्यासाठी अतितीव्र लेसर किरणांचा वापर केला जातो. लेसरमधून बाहेर पडणारी अतितीव्र किरणे नागरिकांसाठी धोक्याची ठरत आहेत. लेसर किरणांचा वापर उद्योग धंदे आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जातो. लेसरच्या वापरात थोडी जरी चूक झाली, तरी त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर होतात. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये लेसरच्या उपकरणांवर इशारा सूचना लिहिलेल्या असतात.आता अशाच लेसरचा सर्रास वापर सण-उत्सवातील मिरवणुकांमध्ये केला जात आहे.
लेसरची तीव्र घातक किरणे डोळ्यांवर इजा करत आहेत. विविध कंपन्यांनी लेसर शोच्या उपकरणांवर त्याच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना लिहिलेल्या आहेत. लेसर किरणांची क्षमता दहा वॅटपेक्षा जास्त वाढवू नये, एकाच ठिकाणी लेसर किरण केंद्रित ठेवू नयेत, नाजूक त्वचा व डोळ्यांना इजा पोहोचू नये, अशाप्रकारे लेसर किरणांचा वापर करावा अशा सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. त्यक्षात लेसर चालकांकडून या सर्व सूचनांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे ही अतितीव्र लेसर शोची किरणे डोळ्यांना घातक ठरत आहेत.