अकोला दि.10: एकात्मिक बाल विकास प्रकल्प मुर्तिजापूर, बहुजन हिताय सोसायटी अमरावती व मैत्री नेटवर्क प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकाकरीता एक दिवशीय आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन गुरुवारी (दि.8) मुर्तिजापूर येथे करण्यात आले. या शिबीरामध्ये कौटुंबिक हिंसाचार, बाल लैंगीक अत्याचार अधिनियम व लैगीक छळाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यशाळेत बहुजन हिताय सोसायटी अमरावतीचे कार्यक्रम व्यवस्थापक सारीका वानखडे यांनी लिंग आधारित हिंसा या विषयावर अंगणवाडी सेवीकांना प्रशिक्षण दिले. तसेच बार असोसिएशनचे महिला उपाध्यक्ष ॲड. कांचन शिंदे यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि बाल लैंगीक अत्याचार अधिनियम 2012 या विषयावर तर केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे यांनी महिलांवर होणाऱ्या लैंगीक छळा विषयी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण कालावधीत अंगणवाडी सेविकाच्या शंकाचे निरासन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैत्री फेलोचे अनिरुद्ध गेडाम यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन मैत्री फेलोचे सुषमा मेश्राम यांनी केले. तसेच प्रशिक्षणाकरीता प्रशिक देवरे, रोधन टाले यांनी सहकार्य केले.