अकोला दि.10 :- मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर होणार आहे. तरी जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम दि. 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे, याचा पडताळा करण्यासाठी याची मदत होणार आहे. विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक ‘सहा ब’मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाचा आहे. तसेच व्होटर हेल्प लाईन ऍप व https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे ही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतात.
मतदारांना आधार क्रमांक मतदार ओळखपत्र सोबत संलग्न करण्यासाठी दि. 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हजर असतील. सर्व मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.