तेल्हारा (प्रा विकास दामोदर)- तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगांव येथे किडनीच्या आजाराने जणू काही थैमान घातले आहे.
गांव तसे समृद्ध, सुशिक्षित सुद्धा बऱ्यापैकी येथील जवळपास १००% शेतजमीन बागायती अर्धी शेतजमीन ही विहिरी व बोअरवेलच्या माध्यमातून बागायत केले जाते तर अर्धी शेतजमीन येथूनच २०किलोमीटर अंतरावर असलेल्या वारी येथील हनुमान सागरातील पाण्याने कालव्याद्वारे केले जाते. गावात दोन जळकुंभ पण तेही ओस पडलेले. गावाकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ५ बोअरवेल व या बोअरवेलचे पाणी थेट पाईपलाईन द्वारे लोकांना पिण्यास सोडले जाते.त्या पाण्यात आरोग्यास अपयकारक क्षारांचे प्रमाण विपुल प्रमाणात दिसून येतात.
व याचीच परिनीती म्हणून की काय, या गावात मागील ५ वर्षात शेकडो लोकांना किडनीच्या आजाराने आपल्या प्राणास मुकावे लागले तर अद्यापही शेकडोच्या वर लोकांना या आजाराने ग्रासले आहे. मागील काळात किडनीच्या आजाराने मृत पावलेले काही लोक ज्यामध्ये दिगंबर श्रीराम ढोले, हरिभाऊ सारंगधार झाडोकार, मनकर्णाबाई मोहन दामोदर, गुडू खान बशीर खान, सर्फराज खान इर्शाद खान, भीमराव मानाजी दामोदर, सुखदेव यशवंत दामोदर, दिगंबर यशवंत दामोदर, द्वारकाबाई अमृता दामोदर, प्रल्हाद भिकाजीं दामोदर, रामकृष्ण पांडुरंग दांडगे, अख्तरखान कादरखान, कमलाबाई बाबुराव दामोदर, मंगलाबाई शंकरराव इंगळे, वसंतराव ढोले, वासुदेव जगदेव दहिकार, सुरेश वसो, कलीम पठाण शाकीर पठाण, रामभाऊ सीताराम भाकरे, असे कित्येक तरी नावे सांगता येतील व बरेच लोक अद्यापही किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत.एवढे सर्व लोक दगावले व कित्येक तरी लोक बाधित आहेत आहेत तरी पण याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष द्यायला कोणी तयार नाही. एक एक करत असे कित्येक तरी लोक दगावत आहेत.
येथून जवळच वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान सागरातून पाणी अकोला, शेगाव, जळगाव जा. इथपर्यंत पिण्यासाठी जाऊ शकते मग हे धरण इतक्या जवळ असून येथील लोकांना याचे पाणी पिण्यास केव्हा मिळणार एरव्ही सिंचणासाठी मात्र पाणी गावात येतेच. याच विधानसभा मतदार संघांचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांचेकडे ग्रामपंचायतने कित्येकदा या पाण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. या क्षारयुक्त पाण्यामुळेच कित्येक महिला विधवा तर कित्येक पुरुष विधुर व लहान मुले अनाथ झालेत. हे असेच किती दिवस चालणार यासाठी कोणी या गावातील लोकांच्या मदतीला कोणी धावून येईल का? असा प्रश्न सर्वसामाण्यांना पडलेला आहे.
आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे रस्ते व पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्यांच्या मागील मतदार संघात विकास महर्षी म्हणून प्रसिद्ध आहेत ते तरी या ज्वलंत समस्यावर काही तोडगा काढतील का? अशी आस लावून भोळी भाबळी जनता बसलेली आहे. तरी संबंधित यंत्रणानी या गावातील लोकांची समस्या कायम स्वरूपी मिटवून उशासी असलेल्या हनुमान सागर धरणातून घशाची कोरड मिटवावी हीच सर्वसामान्याची अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया
पिण्याच्या पाण्यात विपुल प्रमाणात क्षार असल्यामुळे अनेक लोक दगावलेत तर अजूनही काही लोकांचे डायलेसिस सारखे महागडे उपचार दवाखान्यात सुरु आहेत लोकांना या नरकयातनेतून सुटका करण्यासाठी शासनाने येथील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटवावी जेणेकरून गावातील कोणावरही अकाली जाण्याची वेळ येणार नाही.
प्रा.प्रदिप ढोले
सा. कार्यकर्ते, घोडेगाव.