ज्या पुढाऱ्याच्या नावाला पुढे करून नवीन शिवसेना स्थापन करू पाहणाऱ्या किंबहुना जुन्याच शिवसेनेवर आपला हक्क दाखविणाऱ्या ना. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमने सध्या व्ही व्ही आय पी लोकांकडे गणपती दर्शनाचा सपाटा लावला आहे. गणेशोत्सवामध्ये किंवा दुर्गा उत्सवामध्ये दर्शन किंवा दुर्गा पूजन करायला जाणे स्वाभाविक आहे. अनेक अभिनेते अभिनेत्र्या सुद्धा देवदर्शनाला जात असतात, असा हा कालावधी आहे.
गत पाच दिवसांपासून टीव्हीवर झळकणाऱ्या बातम्या आणि वृत्तपत्रातील रकाने बघून आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे स्वतःला शिलेदार किंवा पाईक म्हणवुन घेणाऱ्या ना. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले. त्यानंतर राणे कुटुंबीयांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. आणखी काही मोठ्या व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेतल्याच्या बातम्या झळकत होत्या. मुळात ज्या स्वर्गीय आनंद दिघे यांचा वारंवार कार्य दाखला देऊन आम्ही त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मरक्षणार्थ काम करीत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवित त्यांनी दाखविलेली दिशा क्रमित करीत चाललो आहोत, असा आभास एकनाथ शिंदे यांच्याकडून निर्माण केला जात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे हे गणपती उत्सवामध्ये कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जुन गणपती दर्शनाला जात असत. तळागाळातील कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे म्हणून पायाला भिंगरी लावून गोरगरीब, सामान्य, मध्यमवर्गीय अशा नागरिकांच्या घरी दिघे साहेब न चुकता जायचे. गरिबातल्या गरिबाला आणि श्रीमंतातल्या श्रीमंताला एकाच न्यायाने वागणूक देणारे आनंद दिघे म्हणूनच “धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब” म्हणून ओळखले गेले आणि आजही ते चाहत्यांच्या मनामध्ये कोरले गेले आहेत. इथे मात्र प्रसार माध्यमांचा गराळा आणि त्यातून एकनाथ शिंदे साहेब राज साहेबांच्या निवासस्थानी शिरण्याअगोदर प्रसारमाध्यमांना देणारे विविध पोजेस आणि त्यांच्या निवासस्थानातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रकट पथ मुलाखत देताना त्यांच्या भेटीचे औचित्य पटवुन सांगणे, हे सर्व आठवडाभर झाले सुरू आहे. ना. राणे कुटुंबीयांच्या निवासस्थानी सुद्धा असाच काहीसा प्रकार बघायला मिळाला.
राजकीय समीकरणाचा गोतावळा जुळवताना गणपती बाप्पाला माध्यम करून आपण दिघे साहेबांचे पाईक आहोत, हे सांगणे महाराष्ट्रातील जनतेला तरी आवडणारे नसावे. मुख्यमंत्री होण्यापुर्वी तुमच्यामागे आलेल्या जनतेच्या अर्थात मतदार संघातील किती सामान्य, मध्यमवर्गीय मतदारांच्या आणि गरीब शेकडो कार्यकर्त्यांच्या घरी आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या आनंदाने गणपती दर्शनाला जाऊन महाप्रसाद घेतला? याच्या बातम्या सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये आल्या असत्या तर दिघे साहेबांच्या विचारांना आपण खरंच अनुग्रहित करीत आहात, याची शाश्वती आली असती. पण नामदार शिंदे यांनी व्हीव्हीआयपी यांच्याकडून बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या निमंत्रणाला प्राधान्यक्रम देऊन तेथे न चुकता जाणे पसंत केले. आणि जनतेला आपण स्व. आनंद दिघे साहेबांची विचारधारा कशी खंबिरपणे जोपासणार आहोत, हे सांगणे म्हणजे विरोधाभासच म्हणावा लागेल, जो सबंध महाराष्ट्र बघत आहे.
देवदर्शनासाठी सकाळी आठ वाजता मठातुन निघालेले धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब कार्यकर्त्यांची घरे पिंजत पिंजत येताना रात्रीचे तीन वाजतात, तरीही त्यांच्या पोटात अन्नाचा घास नसतो. शेवटी मठाजवळ परत आल्यानंतर एक कार्यकर्ता त्याच्या घरी दिघे साहेब येणार म्हणून उत्तर रात्रीपर्यंत वाट बघत असतो, हा निरोप दिघे साहेबांना कळतो आणि निरोप कळताच, ‘तू ताट वाढून ठेव, मी तेवढे दर्शन करून आलोच’, असे दिघे साहेब म्हणतात आणि गाडी कार्यकर्त्याच्या घराच्या दिशेने वळवितात. तेथेच त्यांच्या गाडीला अपघात होतो आणि त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागते.
कार्यकर्ते जोडण्यासाठी आणि जोपासण्यासाठी रक्ताचे पाणी आणि हाडाची काडं करावी लागतात तेव्हा कुठे संघटना उभे राहत असते आणि धर्मवीर दिघेंसारखे अव्दितीय नेतृत्व घडत असते. त्यासाठी अंतर्मनातून कार्यकर्त्यांविषयीची तळमळ आणि आपुलकी पाहिजे असते. येथे मात्र बघ्यांच्या गर्दीला दिसण्यासाठी आम्ही व्हीव्हीआयपीकडे देवदर्शन करित असु किंबहुना आमचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी जर मोठ्या पुढार्यांच्याच घरी दर्शनाला जात असू तर आपला वसा आणि वारसा खरंच जो सांगताहात “तोच” आहे का? यावर यक्ष प्रश्न तयार होतो. महाराष्ट्रातील जनता प्रत्येक पुढाऱ्यांचे सर्वच तालतंबोरे बघत असते आणि वेळप्रसंगी त्यांना त्यांची जागा दाखवित असते.
अकोल्यात नव्यानेच स्थापन झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उपशहर प्रमुख पदाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अकोला दौर्यात त्यांच्याकडून स्वीकारून कामास लागलेल्या भागवत अजाबराव देशमुख या युवकाची गळा आवळून हत्या केली जाते आणि त्याचा मृतदेह तलावात फेकून देण्यात येतो त्यानंतर त्याचे मारेकरी मोकाट फिरतात. अशा परिस्थितीत आणि अवस्थेत जर नामदार एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते असतील तर आम्ही खरंच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे, आचरांचे आणि कर्तुत्वाचे पाईक, वारसदार किंवा शिलेदार आहोत का ? हा प्रश्न अंतर्मुख होऊन स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. धर्मवीर दिघे साहेबांचे समाजकारण हे त्यांच्या राजकारणाचे कवच होते त्यामुळेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा शिवसेनेत कटू वाटणारा नियम होता पण येथे तर राजकारण हेच समाजकारणाचे सूत्र वाटायला भरपूर वाव आहे.
कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी आणि त्यांना जपण्यासाठी धर्मवीर दिघे यांची तळमळ, आपुलकी आणि आत्मीयता त्यांच्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी धर्मवीर चित्रपटातून जरी बघितली तरी अंगावर शहारे आणणारी आहे. तेथेच साक्षात धर्मवीरांचे शिलेदार म्हणून घेणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांप्रतीची आत्मीयता, तळमळ आणि आपुलकी प्रत्यक्ष जरी बघितली तरी शिसारी यायला होते, हे वास्तव अधिक गडद होत चालले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. खरंतर कार्यकर्ते हा भेदभाव सहन करतील काय? आणि करतील तर किती दिवस ? हे सुद्धा लवकरच सूर्यप्रकाशाएवढे उघड होऊन समोर येईल यात तीळ मात्र शंका नाही. चिरकाल पुढारी होणे सोपे नाही, ते होता आले पाहिजे आणि पुढारीपण जपणं हे पुढारी होण्यापेक्षाही भयानक कठीण आहे. त्यासाठी त्यागाची आणि समर्पणाची भावना अंतर्मनात लागते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे वाघाच्या कातडीखाली कोल्हा निघू नये, एवढीच माफक अपेक्षा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाळगण्यास हरकत नाही.
संजय कमल अशोक
पत्रकार , अकोला.
7378336699