अकोला :- काल अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुखद घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. रोशनी अनिल वानखडे रा. धोतर्डी असे या तरुणीचे नाव असून ती स्पर्धा परीक्षेसाठी अकोल्यात बहिणीकडे रहायची, काल तिच्या अचानक जाण्याने धोतर्डी गावात शोककळा पसरली. मृत्यू नेमका कश्याने झाला हे अजून स्पष्ट झाले नसून आज शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील गरीब कुटुंबातील रोशनी हिच्या वडिलांचे निधन झाले असून कुटुंबात आई, दोन भाऊ आणि बहीण आहे. पोलिस बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र तयारी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून रोशनी ही रणपिसेनगरातील तिच्या बहिणीकडे राहायला होती. ती पोलीस भरतीसाठी वसंत देसाई स्टेडियमच्या मैदानावर सकाळ-सायंकाळ शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करत होती. मात्र बुधवारी सायंकाळी धावताना ती अचानक कोसळली. यावेळी सोबतच्या मैत्रिणींनी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यात हालचाली झाल्या नाही. तत्काळ ऑटो रिक्षातून तिला रुग्णालयात हलवले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर रनिंग करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. आधीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना पोलीस होऊन कुटुंबाला हातभार होईल, असे तिचे स्वप्न होते. मात्र रोशनीच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, तिच्या नातेवाइकांचे सांत्वन आणि मदत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पराग गवई यांनी केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडा होणार आहे.
गतवर्षी दोन गुणांनी हुकला रोशनीचा नंबर
मागील वर्षी रायगडला पोलीस भरतीमध्ये रोशनीने प्रयत्न केला होता. मात्र, तिला दोन गुण कमी पडले होते. त्यानंतर पुन्हा जिद्दीने तिने सराव सुरू केला. पोलिस बनण्याचे तिच्या नातेवाइकांचे स्वप्न अधुरेच राहिले. रोशनीला कोणताही आजार नव्हता, अशी माहिती समोर येत आहे.
 
			











