अकोला: दि.9 :- किटकनाशक वापरादरम्यान विषबाधा होण्याची शक्यता टाळण्यासाठी किटकनाशक फवारणीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत शेतकरी व फवारणी कामगारांमध्ये जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.
या बैठकीस प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
किटकनाशक फवारणी दरम्यान फवारणी करणाऱ्या व्यक्तिस विषबाधा ही सुरक्षा उपाययोजनांचे पालन न केल्याने होते. त्याबाबत जनजागृती ही दरवेळी केली जाते. मात्र त्याचे पालन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने सुरक्षा उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. तथापि, विषबाधेच्या घटना घडल्यास बाधित व्यक्तिस तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापासून ते जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणांपर्यंत सर्व सज्जता ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले.