मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट व भाजपकडून प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), चंद्रकांत पाटील (कोथरूड), सुधीर मुनंगटीवार (बल्लारपूर), विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), मंगलप्रभात लोढा (मुंबई) यांनी शपथ घेतली. तसेच शिंदे गटाचे संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दूल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई (पाटण) यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली. वारंवार तारखा सांगूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नव्हता. दोघांकडून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात होते. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी अनिश्चितता होती. या याचिकेवर निर्णय आल्यानंतरच विस्तार केला जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे विरोधी पक्ष शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका केली होती. अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला.
आज १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये तानाजी सावंत, दीपक केसरकर या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा शिंदे सरकारमध्ये संधी मिळाली आहे. भाजपने मात्र माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली आहे. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकरांची मात्र मंत्रिपदाची संधी हुकली आहे. प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार यांनाही मंत्रिपदासाठी थांबावे लागले आहे.