अकोला,दि.4 : जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिका आता नियमितपणे सोमवार ते रविवारपर्यंत सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत सुरु राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिका नियमित सोमवार ते रविवारपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिका आता नियमितपणे सातही दिवस म्हणजेच सोमवार ते रविवारपर्यंत सकाळी पावणेदहा ते सव्वासहा वाजेपर्यंत सुरु राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.