अकोला दि.19: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या संततधार पर्जन्यमानामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी वाढणे, घरांची अंशतः पडझड झाल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणा दक्ष असून मदत व बचाव कार्य करीत आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या नुकसानीची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली ती याप्रमाणे-
अकोला तालुक्यात ६६ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद आहे. उगवा येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. अकोला ते वाडेगाव हा रस्ताही बंद आहे. मोराडी रस्ता तसेच अकोला ते म्हैसांग रस्त्यावर पाणी आहे. नदी नाल्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बाळापूर तालुक्यात आठ घरांचे अंशतः नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर पुरामुळे अकोला गायगाव हा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोहारा येथे मन नदीवरील वाहतुक सद्यस्थितीत सुरळीत आहे. पारस धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. बाळापूर येथील पुलावर आलेले पाणी आता ओसरले असून स्थिती पूर्वपदावर येत आहे. नदी काठांवर असलेल्या गावांमध्ये दवंडीद्वारे सतर्कतेची सुचना देण्यात आली आहे. मौजे उरळ बु. येथे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
तेल्हारा तालुक्यात पाच घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पूरस्थितीबाबत नदी काठावरील गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. वान धरणात ५९.५० टक्के साठा झाला आहे.
मुर्तिजापूर तालुक्यात दोन घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तरपोही गावात जाण्या- येण्याचा मार्ग, कळमगंगा नदीला पूर आल्यामुळे धोत्रा ते निंभा रस्ता, तसेच गोरेगाव येथील कोलाडी नाल्यास पूर आल्यामुळे मुर्तिजापूर ते पळसो हे रस्ते बंद आहेत. तालुक्यातील उमा धरणात ३१.५२ टक्के तर वाई धरणात ५९.०३ टक्के जलसाठा झाला आहे. चिखली येथील कोडा नाला येथे पूर आल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पातुर तालुक्यात सामान्य स्थिती आहे. गेल्या २४ तासांत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
बार्शी टाकळी तालुक्यात आठ घरांचे अंशतः नुकसान तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. दोन बैल मृत झाले आहेत. दोनद बु. हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
अकोट तालुक्यात केळीवेळी, गिरजापूर, धारुर येथे अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी जमा झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोपटखेड धरणातून विसर्ग होत आहे.
आणखी पर्जन्यमानाचा इशारा
भारतीय हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि.२० पर्यंत अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस (७६ ते १०० मि.मी.) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील दगडपारवा प्रकल्पांत ६१.४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून आणखी पाणीसाठा होत आहे. त्यामुळे या पाण्याचा विसर्ग मोर्णा नदीत होण्याची शक्यता आहे. तसेच अकोट तालुक्यात पोपटखेड प्रकल्पातही ७८.०६ टक्के जलसाठा झाला असून या प्रकल्पातून पठार व खैनदी या नद्यांच्या पात्रात १८८.९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात पुर्णा मध्यम प्रकल्पातून १३४.९९ क्युमेक पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीत केला जात आहे. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी- कर्मचारी यांनी मुख्यालयीच रहावे,असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तसेच नदी नाल्याच्या काठावर असलेल्या गावांनी तसेच पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांनी सतर्क रहावे. नदी, नाळे, तलाव बंधारे येथील जलसाठ्यात पोहण्याचे वा पूरस्थितीतून बाहेर पडण्याचे धाडस नागरिकांनी करु नये. पुलावरुन रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास दक्षता घ्यावी,असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.