अकोला दि.18: बियाणे,खते व किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 9 कृषी निविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करत 19 परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले तर एक परवाना रद्द केला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, कृषी निविष्ठा केंद्र तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार भरारी पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकांच्या कारवाईचा आढावा जिल्हाधिकारी यांनी दर सोमवारी घेतल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भातील आजच्या आढावा बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद डॉ. मुरली इंगळे, सर्व तालुका कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक आदी उपस्थित होते.
या बैठकीत माहिती देण्यात आली की, या पथकाव्दारे जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी निविष्ठा केंद्राच्या तपासणीमध्ये 13 कृषी निविष्ठा केंद्रात त्रुटी आढळल्याने त्यांचे 23 परवाने कायदेशीर कारवाईकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले होते. त्यावर कारवाई करीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी अकोला येथील पाटणी ट्रेडर्स यांचा रासायनिक खत परवाना रद्द केला. तर बार्शी टाकळी तालुक्यात मे. कळंब कृषी सेवा केंद्र यांचे व साईबाबा कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके असे प्रत्येकी तीन परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. मुर्तिजापूर तालुक्यात मे गुरुकृपा ॲग्रो एजन्सीज बियाणे व रासायनिक खते विक्री , मे. गजानन ॲग्रो एजन्सीज यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री, तसेच मे शेतकरी कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री असे प्रत्येकी दोन या प्रमाणे असे एकूण सहा परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. बाळापूर तालुक्यात मे विदर्भ इरिगेशन यांचे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके व शिव ॲग्रो एजन्सीज चे बियाणे, किटकनाशके व रासायनिक खते असे तीन परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. तर पातुर तालुक्यात मे सोपीनाथ कृषी सेवा केंद्र यांचा बियाणे परवाना एक महिन्यासाठी निलंबित केला आहे. असे एकूण 9 विक्रेत्यांच्या 20 परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एक परवाना रद्द तर 19 परवाने हे एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. खत नियंत्रण आदेश 1985, बियाणे नियंत्रण आदेश 1983, किटकनाशक नियंत्रण आदेश 1968 नुसार ही कारवाई करण्यात आल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके विक्री संबंधी तक्रारी असल्यास संबंधीत तालुका व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते. या बैठकीस स्वतः तक्रारदार स्वतः शेतकऱ्यांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.