अकोला,दि.१४: कारंजा रमजापुर (नवा अंदुरा) संग्राहक ल.पा.योजना ता.बाळापुर या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामुळे मौजे उरळ बु. व मौजे उरळ खु. या गावांना जोडणाऱ्या रपट्यावर व लहान पुलावर पाणी वाहत असून याठिकाणी गावाचा संपर्क पूर्ववत करण्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला. त्याद्वारे गावातील रुग्ण, तसेच काही यात्रेकरुन व वैद्यकीय पथकांची सुखरुप ने आण करण्यात आली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्रतिसाद दलाकडून प्राप्त माहितीनुसार, याठिकाणी पाणी वाढत असल्याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिलेल्या निर्देशानुसार, याठिकाणी मदत व बचाव पथके रवाना करण्यात आली. त्यासाठी उपविभागीय अधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी यांच्या मार्गदर्शनात उरळ बु. व उरळ खु. या गावातील सात रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेण्यात आले. नुकतेच पंढरपूर हून परतलेले १० यात्रेकरुंनाही पुन्हा गावात नेण्यात आले. तर गावातील लोकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या पाच जणांची टिमही या बोटीतून ने आण करण्यात आली.वैद्यकीय पथकामधे डॉ. केतन गुंडल, डॉ.राजेश दण्डले ,राजेन्द्र सरदार व आरोग्य सेवक यांचा समावेश आहे. आज या गावातील गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आवश्यक औषधी वितरित करण्यात आले. या मदत कार्यात जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक सदस्य व कुरणखेड येथील वंदे मातरम आपत्कालिन पथकाचे सुनिल कल्ले, हरीहर निमकंडे , सुनिल आटोटे, मनिष मेश्राम, गौतम माहोड, नितेश मोहोड ,नजर अली, रहीम शहा समाधान आटोटे, तलाठी योगेश पाखरे आदी तसेच बाळापूर तहसिलदार सैय्यद व मंडळ अधिकारी फिरके सहभागी होते.
दरम्यान आज सकाळी ११ वाजेपासून पानखास नदीवरील कारंजा रमजापूर धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे आता पाण्याची पातळी खालावत असून या दरम्यान पाऊस आला नाही तर परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकेल असे अनुमान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप साबळे यांनी व्यक्त केले.