टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी ट्विटर विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला आहे. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी फेक अकाउंटची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता इलॉन मस्क यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.
(Elon Musk) इलॉन मस्क यांच्या वकिलांनी सांगितले की, ट्विटर अनेक विनंत्या करूनही बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यात अयशस्वी झाले. “मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे ते असे करत आहेत. ट्विटरने इलॉन मस्क यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा करार त्यावरच अवलंबून होता,” असे मस्क यांच्या वकिलांनी सांगितले.
“ट्विटरने त्या करारातील अनेक तरतुदींचे भौतिक उल्लंघन केले आहे. त्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे असे दिसते ज्यामुळे इलॉन मस्क यांना करार रद्द करण्यास प्रवृत्त केले,” असे इलॉन मस्क यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
ट्विटर कायदेशीर कारवाईही करणार
यानंतर, आता ट्विटरकडून असे सांगण्यात आले आहे की कंपनीला हे विलीनीकरण पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. कराराची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटर बोर्ड कायदेशीर कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी म्हटले आहे.