Maharashtra Rain Updates: मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून पुढीत तीन ते चार तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्याच्या परिसरात ढगांची दाटी अजूनही कायम असून येत्या तीन ते चार तासांत मुसळधार पावासाची शक्यता आहे, असं ट्विट भारतीय हवामान विभागानं केलं आहे. यासोबतच १९ ते २३ जुलै या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण कोकण किनारपट्टी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या आणि परवा या भागात ऑरेंज अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. यासोबतच मराठवाडा, विदर्भात याच कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर, नवी मुंबई परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मुसळधार पावसानं रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मुंबईच्या उपनगरी रेल्वेला देखील मोठा फटका बसला आहे. तर कोकण रेल्वे देखील ठप्प झाली आहे.