अकोला, दि. 5 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा सेतू समितीव्दारे नागरिक व विद्यार्थ्यांना उत्पन्न, अधिवास, राष्ट्रीयत्व, जात व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतात. त्याकरीता विद्यार्थ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करावे. या प्रमाणपत्रासाठी शासकीय नियमानुसार शुल्क व निर्गमित कालावधी निश्चित करण्यात आले आहे. तरी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांना नागरिक वा विद्यार्थांनी प्रमाणपत्रासाठी नियमानुसार ठरलेल्या शुल्का इतकेच शुल्क द्यावे;अतिरिक्त शुल्क देवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
नागरिक व विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राकरीता आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे सादर करावे. त्यानंतर कागदपत्रे स्कॅनिंग करुन तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. तहसील कार्यालयामध्ये कागदपत्राची तपासणी करुन उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तहसील कार्यालय येथून तर जातीचे प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात येतात. प्रमाणपत्रावर डिजीटल स्वाक्षरी झाल्यानंतर प्रमाणपत्र पुन्हा ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्रावर पाठविण्यात येऊन नागरिक किंवा विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतात. याकरीता प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक प्रमाणपत्राकरीता लागणारे शुल्क व कालावधी निश्चित आहेत.
ते याप्रमाणे-उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्राकरीता प्रत्येकी शुल्क 33.60 पैसे तर प्रमाणपत्र सात दिवसात निर्गमित होईल. तसेच जात प्रताणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राकरीता प्रत्येकी शुल्क 57.20 पैसे व प्रमाणपत्र 21 दिवसात निर्गमित होईल. विहित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांवर रितसर तक्रार तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे करावे. आकारण्यात आलेल्या शुल्काची रीतसर पावती दिल्याशिवाय शुल्क देण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.