अकोला, दि.५: ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसंदर्भात जिल्ह्यात ४० बालकांच्या शैक्षणिक खर्चासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत या बालकांचे शिक्षणात खंड पडू नये वा त्यांना अडचण भासू नये याची खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
मिशन वात्सल्य अंतर्गत आज आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. अस्मिता पाठक तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना देण्यात आलेल्या मदतीचा आढावा सादर केला. ४० बालकांचे शैक्षणिक खर्चासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यास मान्यता देण्यात आली. या बालकांना लागणाऱ्या मदतीचा आढावा वेळोवेळी घेत रहावे,अशा सुचनाही जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चाईल्ड लाईन क्रमांक १०९८ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या वॉल स्टिकर्सचे विमोचनही करण्यात आले.