एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज ( दि. ४ ) विश्वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. ( Maharashtra govt floor test) शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ सदस्यांनी मतदान केले.
( Maharashtra govt floor test) रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले होते. त्यांना १६४ मते तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. या निवडणुकीत नार्वेकरांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.
शिंदे गट हाच शिवसेनेचा अधिकृत विधिमंडळ पक्ष; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांचे पाठबळ असलेल्या शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांचे गटनेतेपद आणि सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोदपदही रद्द ठरवले होते.