अकोला, दि.1 :- प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. प्रशिक्षणाला प्रात्यक्षिकाची जोड देऊन प्रत्यक्ष परिणाम दाखवावे, त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल व जिल्ह्यात उत्तम शेळ्यांची पैदास होऊन उत्पन्न वाढेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.
पशुसंवर्धन विभागातर्फे शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणी साठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांचे मार्फत जिल्ह्यात कार्यरत पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 यांना ‘शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन’ याबाबत एक दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण आज देण्यात आले. येथील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश बुकतारे, पशुचिकित्सा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिघे, डॉ. चैतन्य पावसे, डॉ. दळवी, डॉ. तुषार बावने यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात संकरीत जातीच्या शेळ्या जमनापारी,दमास्कस,उस्मानाबादी इ. प्रकारच्या संकरीत प्रजातीच्या शेळ्या उत्पादनास प्रोत्साहन मिळेल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश बुकतारे यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. सुभाष पवार यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा कमी गुंतवणूकीत जास्तीत जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असुन त्यासाठी प्रयत्न व्हावे,असे आवाहन डॉ. पवार यांनी केले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी प्रशिक्षण उपक्रमाचे कौतूक केले व प्रशिक्षणाला प्रात्यक्षिकाची जोड असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहे.