अकोला,दि.29 (डॉ. मिलिंद दुसाने)- श्वान अर्थात कुत्रा.इमानदार मुका प्राणी. धन्याशी इमान राखावे ते कुत्र्यानेच. बोलकी माणसे गुन्हे करतात आणि मुके कुत्रे त्याचा छडा लावतात. पोलिसांचे श्वानदल हे त्याचे प्रत्यक्ष प्रमाण. अकोला पोलीस दलात सहा श्वानांचे पथक असून त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने मोलाचे कार्य केले आहे.
अकोला पोलीस दलातील सहा श्वानांपैकी तीन गुन्हे शोधक, एक अमलीपदार्थ शोधक आणि दोन स्फोटके म्हणजेच बॉम्ब शोधक पथकात आहेत. या सहा जणांपैकी चार श्वान (लक्ष्मी, रेवा, झोया आणि ल्युसी) ह्या मादी आहेत तर बॉम्ब शोधक पथकातील दोघे श्वान (रॅम्बो आणि ब्राव्हो) नर आहेत. चार मादी श्वानांपैकी तिघी ह्या डॉबरमन तर एक जर्मन शेफर्ड आणि बॉम्ब शोधक पथकातील दोघे लॅब्रॉडॉर आहेत.
अस्सल जातीवंत श्वानांची निवड
पोलीस दलात उत्तम जातीवंत हुशार, चपळ श्वानांची निवड केली जाते. शासनाने प्रमाणित केलेल्या श्वान प्रजोत्पादन केंद्रांकडून हे श्वान प्राप्त केले जातात. निवडीचे हे काम पोलीस दलातील श्वान पथकाचे अधिकारी- कर्मचारी करतात. श्वान निवड करतांना त्या श्वानाची तीन पिढ्यांआधीची वंशावळ प्रमाणित करुन घेतली जाते. त्यानुसार श्वानाची निवड केली जाते. अकोला पोलीस दलातील लक्ष्मी कोल्हापूर, रेवा पुणे येथून तर झोया अलवर राजस्थान येथून आणि ल्युसी नागपूर येथून आल्या आहेत. तर रॅम्बो आणि ब्राव्हो हे दोघे सख्खे भाऊ असून अकोल्यातीलच आहेत.
दिले जाते प्रशिक्षणही
पोलीस दलात दाखल झाल्यानंतर श्वानांचे सहा ते नऊ महिने कालावधीचे प्रशिक्षण होते. प्रशिक्षण त्यांचे उपजत गुण आणि पोलीस दलात करावयाच्या कामगिरीनुसार दिले जाते. त्यांचे प्रशिक्षण चंदीगड व पुणे येथे झाले आहे. शिस्तीचे पालन, सुचनांचे पालन, वासाचे प्रशिक्षण, माग काढणे इ. प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानुसारच त्यांचे स्पेशलायझेशन ठरते. उदा. अंमलीपदार्थांचा माग काढणे, स्फोटक पदार्थांचा माग काढणे, किंवा वस्तू हुंगून घामाचा वास लक्षात ठेवून व्यक्तिंचा माग काढणे इ.
‘हॅण्डलर्स’शी होते भावनिक नाते
प्रशिक्षणानंतर श्वान स्थानिक पोलीसदलाच्या देखरेखीखाली येतात. पोलीस दलात एका श्वानासाठी दोन कर्मचारी असतात. त्यांना डॉग हॅण्डलर असं म्हणतात. त्या श्वानाची शारिरीक स्वच्छता, दररोजचे विधी, आहार, नियमित वैद्यकीय तपासणी इ. बाबी या कर्मचाऱ्यांना पूर्ण कराव्या लागतात. श्वानांना दररोज सराव दिला जातो. त्यासाठी मैदानांवर नेऊन व्यायाम, सुचनांचा सराव इ. दिले जाते. निवासासाठी पुरेशी जागा, खेळती हवा, बसण्यासाठी लाकडी पाट, गादी, हिवाळ्यात उबदार कोट, उन्हाळ्यात कुलर, पंखे इ. सुविधा श्वानांना दिल्या जातात. त्याकडे कर्मचारी लक्ष पुरवितात. सहा महिन्यातून एकदा येणाऱ्या समागमोत्सुक काळात त्यांना 21 दिवसांची सक्तीची विश्रांती दिली जाते.
अकोला पोलीस दलात अनिल जगताप, भारत ठाकूर, राजू चौधरी, अतुल दुतोंडे, आनंद गायकवाड, किरण अहिर, गोपाल चव्हाण, गणेश महाले, सुनिल सोळंके, संदीप कडेल, विशाल येवतेकर, रविंद्र चोपडे हे या श्वानांचे हॅण्डलर आहेत. या सर्व श्वानपथकाचे नियंत्रक पीएसआय धर्मेंद्र मडावी हे आहेत. हे सर्व हॅण्डलर्स आपापल्या श्वानाची जबाबदारी पार पाडतात. या प्रक्रियेत श्वानांचे आणि हॅण्डलर्सचे जिव्हाळ्याचे नाते तयार होते.
अकोला श्वानदलाची कामगिरी
आतापर्यंत लक्ष्मीने पाच, रेवा ने सहा, झोयाने दोन असे गुन्हे तर ल्युसीने अमली पदार्थांशी निवडीत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर रॅम्बो आणि ब्राव्हो हे गेल्या चार वर्षापासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या दौऱ्यांसाठी आपली सेवा देत आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यक्रम, बैठका, सभा या स्थळांची या श्वानांकडून सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाते.
स्पर्धा, पारितोषिक आणि सेवानिवृत्ती
पोलीस दल श्वानांच्या कामगिरीची पूर्ण दखल घेते. त्यांच्या स्पर्धाही होतात. त्यांना मेडल्सही दिले जातात. याआधी एका हिरा नावाच्या श्वानास सिल्व्हर मेडल मिळाले होते. आता हिरा सेवानिवृत्त आहे. विशेष म्हणजे 1993 पूर्वी श्वानांच्या बदल्याही होत असत, नंतर मात्र ही प्रथा बंद झाली.
वयाच्या दहाव्या वर्षात पोलीस दलातील श्वान सेवानिवृत्त होतो. त्याला रितसर निरोप दिला जातो. सेवानिवृत्त श्वानाला अन्य श्वानप्रेमी दत्तक घेतात. दत्तक घेण्याआधी नव्या मालकांना त्यांच्या सहवासाचा सराव दिला जातो. लेखी हमीपत्र घेतले जाते. बऱ्याचदा त्यांचे हॅण्डलर्स हेच या श्वानांना दत्तक घेतात, कारण त्यांनाही या नेहमीच्या सहवासातील साथीदाराला सोडणे भावनिकदृष्ट्या शक्य नसते. श्वानांचा निरोप हा एक भावनिक सोहळा असतो. प्राणी मुके असले तरी त्यांचे नाते तयार होते. साधारण पाच वर्षांपूर्वी लक्ष्मी नावाची एक श्वान सेवेत असतांनाच मरण पावली. तिचा रितसर अंत्यसंस्कार करण्यात आला. तिच्या जागेवर आणलेल्या दुसऱ्या मादी श्वानाचे नाव तिची आठवण म्हणून लक्ष्मी असेच ठेवण्यात आले.
माणसेच गुन्हेगार, माणसेच करणार तपास, माणसेच फसवतात माणसांना; हा सगळा माणसांच्या स्वार्थाचा खेळ, या खेळात मात्र स्वार्थ नसलेला मुक्या श्वानाचे वेगळेपण उठून दिसते; ते त्याच्या प्रामाणिकपणामुळे.