अकोला,दि.22 : या ना त्या कारणाने आई वडीलांचे छत्र हरपते आणि अनाथाश्रमात आयुष्य सुरु होतं. कारुण्याची किनार असणाऱ्या ‘अनाथ’पणाच्या आयुष्यातही सातत्यपूर्ण प्रयत्न करुन यशाची झळाळी प्राप्त होते. नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बालगृहांमध्ये राहून दहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय. या दहा जणांमध्ये आठ मुली आणि दोघे मुले आहेत. विशेष म्हणजे यंदा दहावीला असलेली सर्वच्या सर्व म्हणजे दहाही विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. प्रत्येकाच्या डोळ्यात आहेत उद्याची स्वप्ने… आणि चंद्र ताऱ्यांना स्पर्श करण्याची जिद्द!
आईवडील आणि घरात सुबत्ता आहे, अशा मुला मुलींसाठी इयत्ता दहावीचे वर्ष म्हणजे घरात स्पेशल ट्रिटमेंट असते. ट्युशन, क्लासेसचा स्पेशल डोस, येण्याजाण्यासाठी वाहनांची सुविधा, आहारावर विशेष लक्ष, अभ्यासासाठी घरात बहुदा स्पेशल खोली. दिमतिला गाईड, पुस्तके, वह्या इ. आणि वरुन काही हवं नको ते सांग, असा आई बाबांचा आग्रह. यासाठी पूर्वअट असते ती फक्त ‘तू मन लावून अभ्यास कर.’ अशा वातावरणाचा फायदा घेऊन अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घवघवीत यश मिळवून आपल्या आईबाबांच्या कौतुकाचे धनी ठरतात. स्वाभाविकच आहे ते. पण यातली कोणतीही सुविधा नसतांना अनाथालयात राहुन अकोल्यातील या दहा बालकांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलंय.
शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत जिल्ह्यात तीन बालगृहे व एक शिशुगृह आहे. बालकल्याण समितीच्या आदेशान्वये ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा बालकांना तेथे दाखल केले जाते. बालगृहे हेच होते त्यांचे घर आणि तिथले कर्मचारी पालक,नातेवाईक आणि सर्वकाही…
गायत्री बालिकाश्रमातील चारही मुली यंदा दहावीला होत्या. त्या उत्तीर्ण झाल्या. तर सुर्योदय बालगृह या विशेष बालकांचे संगोपन करणाऱ्या बालगृहातील चार मुली व एक मुलगा तर शासकीय बालगृहातील एका मुलानेही यश संपादन केलंय. त्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ही कथा. (प्रत्येकाचे नाव काल्पनिक)
गायत्री बालिकाश्रमातील पूजा ह्या विद्यार्थिनीने 76 टक्के गुण मिळविले. तिला आई, वडील दोघेही नाहीत. नातेवाईकांनी काहीकाळ सांभाळले आणि नंतर चाईल्डलाईन मार्फत तिला येथे दाखल केले. पूजाला आता 11 वी सायन्सला प्रवेश घ्यायचाय आणि डॉक्टर व्हायची तयारी करायची आहे. अर्चनाला 74 टक्के गुण मिळाले. तिची आई वारली त्यानंतर वडील निघून गेले. मावशीने काही काळ सांभाळ केला, मात्र नंतर तिला बालिकाश्रमात दाखल केले. तिलाही डॉक्टर व्हायचंय.
लक्ष्मीला 65 टक्के मिळाले. तिचे आईवडील बेपत्ता आहेत. तिचा सांभाळ येथे होतोय. तिला सायन्सला प्रवेश घेऊन इंजिनिअर व्हायचं आहे.
दुर्गाला 49 टक्के मिळाले. दुर्गासुद्धा बेपत्ता म्हणून सापडली. ती सुद्धा चाईल्ड लाईन मार्फत तिची बहिण व भाऊ यांच्यासह इथं दाखल झाली होती. भावाला दत्तक पालक मिळाले. तर बहीण आता यंदा दहावीला आहे. तिला आयटीआयला प्रवेश घेऊन फॅशन डिझायनर व्हायचंय.
या बालिका स्वामी विवेकानंद शाळेत शिकल्या. त्यांना इथं इयत्ता दहावीच्या अभ्यासासाठी विशेष सुविधा आहे. पहाटे उठून त्यांनी अभ्यास केला. अर्चना आणि लक्ष्मीला एका शिक्षकांनी विनामुल्य शिकवणी दिली. तर इतरांना शिकवणी नव्हती. मात्र या संस्थेने ऑनलाईन वर्गांसाठी मोबाईल, लॅपटॉप इ. सुविधा उपलब्ध करुन दिली होती.
विशेष बालकांसाठी असलेल्या सुर्योदय बालकाश्रमातील अनिताला 79.20 टक्के गुण मिळाले. तिला आई वडील दोघेही नाहीत. एक बहिण आहे मात्र ती विशेष नसल्याने ती अन्य बालिकाश्रमात आहे. तिच कहाणी सुनिताची तिला 71.60 टक्के मिळाली. तिची आई वारली आणि वडील बेपत्ता झाले. या दोघी सरस्वती विद्यालयात शिकल्या. आणि दोघींनाही विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आहे. चंद्रीका ह्या बालिकेला 50.20 टक्के गुण मिळाले तिचे आई आणि वडील हयात नाहीत. ती स्वामी विवेकानंद शाळेत शिकली. तिला आता कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. आशूला 64.60 टक्के गूण मिळाले. तिचे वडील आधीच वारले होते. नोव्हेंबर 21 मध्ये म्हणजे ती दहावीला असतांना तिची आईही वारली. त्यानंतर तिला मेहकर, वाशिम, बुलडाणा मार्फत अकोला येथे दाखल केले. तिने आधी केलेल्या शिक्षणाच्या बळावर अकोला येथे केवळ दहावीची परीक्षा दिली. सलिम हा सुद्धा स्वामी विवेकानंद शाळेत शिकला. त्याला 56 टक्के गुण मिळाले. त्याला कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. या सगळ्यांना ऑनलाईन वर्गांसाठी मोबाईल-लॅपटॉपची सुविधा संस्थेने पुरविली होती. शासकीय बालगृहातला शिव याला 58 टक्के मिळालेत. त्याची मुंबई येथे आदित्यबिर्ला फाऊंडेशनच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तो तिकडे जाणार आहे.
मुलांच्या या यशात कौतुक आहे ते या बालकाश्रमातील कर्मचारी वर्ग, संस्थाचालकांचे. ही मंडळी ह्या मुलांची काळजी घेतात. त्यांचे संगोपन करतात. अभ्यास करुन घेणे, आजारपण, कपडेलत्ते, आहार या सगळ्याचे नियोजन करतात. काय हवं नको ते बघतात. न कळत का असेना पण तेच या मुलांच्या जीवनाचे शिल्पकार ठरतात.
(टिपःया वृत्तातील सर्व बालकांची नावे काल्पनिक आहेत.)