रिधोरा (पंकज इंगळे)- बाळापूर तालुक्यातील ग्राम रिधोरा येथील वार्ड क्र 4 मधील मातंग पुरा भागात गेल्या कित्तेक महिन्यापासून गटारीची सफाई करण्यात आली नसल्याने गटारीमध्ये सांडपाणी, मातीचे थर प्लास्टिक पिशव्या काडी कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पुर्णतः गटार ब्लॉक झाल्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या घराजवळ सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले असून या कडे ग्रामपंचायत प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे. वर्षभर नाली सफाई करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
नाली सफाईचे काम लाखो रुपये खर्च करून सुद्धा हल्ली अर्धवट नाली उपसा, बुजलेल्या नाल्या, मातीचे व कचऱ्याचे थर जमा होऊन खराब सांडपाणी जागीच अडून दुर्गंधी पसरु लागली आहे. सध्या स्थितीत गटारींची अवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे. गटारीच्या उपसा अभावी खराब सांडपाणी एकाच ठिकाणी जमा होऊन डास, किडे व जंत तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी वेगळीच परिस्तिथी निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून स्वच्छतेवर नाही तर गलिच्छतेवर भर दिसतो. त्वरित गटारीचा उपसा करून साफसफाई करण्यात यावी अशी रिधोरा येथील ग्रामस्थांनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना केली आहे.