अकोटः- अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथिल प्रभाग क्रमांक 1 मधील महिला ग्रामपंचायत सदस्य फौजिया अंजुम मोहम्मद साजिद यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (1) ज 3 प्रमाणे सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश दि.16 जून रोजी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिला आहे.
या प्रकरणात बोर्डी येथील अर्जदार नजराना बी ईरशाद अली यांनी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे ग्रामपंचायत सदस्य फौजिया अंजूम मोहम्मद साजिद यांनी बोर्डी येथे राहत असलेल्या व त्यांच्या सासऱ्यांचे नावे असलेल्या एकत्रित कुटुंबातील मालमत्तेत शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आक्षेप दाखल केला होता.
यामध्ये ग्राम विकास अधिकारी अनंत मोहोकार बोर्डी यांनी दि.१५ जून २२ रोजी या मालमत्तेच्या प्रत्यक्ष मोजणीचा लेखी अहवाल अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे दाखल केला होता.त्यावर अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या प्रकरणातील दाखल अर्ज,अहवाल व दस्तऐवज,आदींचे अवलोकन करून या प्रकरणातील गैर अर्जदाराने त्यांच्याकडे असलेल्या एकूण क्षेत्रफळापैकी 312.50 चौरस फूट एवढ्या जास्त शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने ग्रामपंचायत सदस्य फौजिया अंजुम मोहम्मद साजिद बोर्डी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला. या प्रकरणी अर्जदार नजराना बी ईरशाद अली यांच्यातर्फे अॕड.श्रीरंग तट्टे अकोट यांनी बाजू मांडली.