भारताचा वार्षिक पाऊस 75-80% दक्षिण-पश्चिम मान्सूनद्वारे पडतो, जून ते सप्टेंबर या कालावधीत. मान्सूनचा हंगाम सामान्यत: केरळ राज्यात सुरू होतो आणि संपूर्ण भारतात हळूहळू पसरतो , जूनच्या मध्यापासून ते जूनच्या शेवटपर्यंत हा पावसाळा उत्तरेकडे पोहोचतो. उच्च उष्णता, उच्च आर्द्रता, विस्तृत ढग आणि जोरदार जमिनीच्या पृष्ठभागावरील वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पाऊस ही मान्सून हंगामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पावसाळ्याच्या प्रारंभी तापमानात लक्षणीय घट होते (3-60C); तथापि, पावसाळ्यात जेव्हा जेव्हा पाऊस थांबलेला असतो आणि अनेक दिवस पाऊस पडत नाही तेव्हा तापमानात, त्यानंतरची वाढ होते. तापमानातील ही वाढ उच्च आर्द्रतेशी संबंधित आहे, ज्यामुळे उष्णतेच्या तीव्र ताणाचा धोका पक्ष्यांना असतो, विशेषत: हंगामाच्या सुरुवातीला आणि पावसाळ्याच्या विश्रांती दरम्यान.
पावसाळी हंगामासाठी प्रमुख व्यवस्थापन पद्धती:
१. छतावरील भेगा किंवा भिंतींमधील गळती तपासून घ्यावे आणि दुरुस्त करावे .
२. शेडमध्ये पाऊस पडू नये म्हणून बाजूचे पडदे तयार करा. वाऱ्याच्या जोरदार झोतांमुळे फीडरचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घ्या.
३. पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जाण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. शेडजवळ पाणी साचल्याने किटक, मच्छर व जीवाणू यांची पैदास वाढते.
४. पावसाळ्यात पिलांचे पालनपोषण करणे नेहमीच एक आव्हान असते. पावसाचे पाणी आत शिरते आणि खराब वायुवीजन असलेली उच्च आर्द्रता शेडच्या आत अमोनियाची पातळी वाढवू शकते. त्याकरिता पावसाचे पाणी शेडमध्ये जाऊ नये म्हणून बाजूचे पडदे घट्ट बंद ठेवा. अमोनिया आणि इतर अनिष्ट वायू बाहेर जाण्यासाठी दिवसा बाजूच्या पडद्याच्या वरच्या बाजूला 1-2 फूट उघडे ठेवा
५. पावसाळ्यात ओली गादी हे मुख्य आव्हान असते. गादी ओली होण्याचे मुख्य कारणे म्हणजे गळती झालेल्या पाण्याची भांडी अथवा पाईपलाईन किंवा पावसाच्या पाण्याच्या शिडकाव्याने थेट पाणी घरात शिरते. एकदा का गादीचा ओलावा 250ग्र./कि.ग्र. पेक्षा जास्त झाला की, त्या गादीची इन्सुलेट आणि पाणी धारण करण्याची क्षमता धोक्यात येते आणि गादी ओली होते. ओली गादी टाळण्यासाठी कोणतीही गळती होणारी पाण्याची भांडी अथवा पाईपलाईन बदला.
६. फार्मवर असलेल्या कोंबडी खताच्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेतली पाहिजे किंवा पूर्णपणे प्रतिबंधित केले पाहिजे. खतातील उच्च आर्द्रतेमुळे रोग पसरवणाऱ्या बीजाणूंची उगवण होते, रोग वाहक करणारे किटक ,माश्या यांच्यात वाढ होते.
७. दूषित पावसाचे पाणी बोअरवेल आणि जवळपासचे पाण्याचा साठा अथवा स्त्रोत दूषित करू शकतात.
८. पावसाळ्यात अळ्या नियंत्रण ही माशी नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे. ओले खत हे अळ्यांच्या वाढीसाठी योग्य वातावरण आहे. खत कोरडे ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह लार्विसाइड्सचा चांगला परिणाम होऊ शकतो.
९. पिंजरा पद्धतीमध्ये शेडच्या तळाशी जाळी नसेल तर अळ्या असलेले ओले खत अन्य पक्ष्यांना आकर्षित करतात. ज्यामुळे बर्ड फ्लू सारख्या रोगाचा प्रसार होऊ शकतो.
१०. खाद्याचे वेगवेगळे घटक जलरोधक स्थितीत ठेवले पाहिजे. ओलावा पातळी वाढल्याने खाद्यामध्ये काही मायकोटॉक्सिन(बुरशीजन्य) दूषित होण्याचा धोका वाढतो. फीड मिल, फीड बिन आणि शेडच्या आतील फीडरची जलरोधक स्थिती सुनिश्चित केली पाहिजे. खाद्याच्या पोत्याच्या पृष्ठभागाशी थेट संपर्क टाळण्यासाठी खाद्य आणि खाद्य घटक स्लॅटवर साठवले पाहिजेत किंवा जाड लाकडी फळीवर ठेवावे. उच्च सापेक्ष आर्द्रता, खाद्याची भांडी यांचा पावसाच्या पाण्याचा थेट संपर्क आणि भांड्यामध्ये खाद्याचे केक झाल्याने काही मायकोटॉक्सिन तयार होऊ शकतात, ज्याचा पक्ष्यावर नकारात्मक परिणाम होतो. फीडरमधून जुने आणि केक झालेले फीड नियमितपणे काढून टाका. फीडरची नियमित संपूर्ण साफसफाई केली पाहिजे. फीडरमध्ये जास्तीचे खाद्य टाकणे टाळा. खाद्यामध्ये टॉक्सिन बाइंडरचा समावेश करणे गरजेचे आहे, कारण पावसाळ्यात पर्यावरणीय परिस्थिती मायक्रोटॉक्सिन दूषित होण्यास अनुकूल असते.
११. पावसाळ्यात विशेषतः पृष्ठभागावरील पाण्यावर पाण्याच्या गुणवत्तेवर सहज परिणाम होऊ शकतो. उच्च तापमान आणि आर्द्रतेमध्ये ई.कोलाय या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, कारण जिवाणू आणि इतर जंतू लवकर वाढू शकतात, ज्यामुळे कोंबड्यांमध्ये संसर्ग वाढतो. दूषित पाण्याचे स्त्रोत देखील उद्रेक ठरु शकतात, म्हणून नियमित पाणी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. पाइपलाइन पूर्णपणे स्वच्छ करत रहावे, कारण यामुळे पाईपलाईनच्या आत बायोफिल्मची पातळी कमी होण्यास मदत होईल, जे दूषित होण्याचे स्रोत आहेत.
१२. स्थानिक शेतातील पिकांच्या वाढीचा परिणाम म्हणून पावसाळ्यात उंदीर यांची संख्या वाढते. उंदीर वाढल्याने रोगाचा प्रसार वाढतो. या कालावधीत उंदीर नियंत्रणाचे कठोर उपाय अंमलात आणले पाहिजेत आणि पोल्ट्री हाऊस आणि फार्म जवळच्या वनस्पती नियमितपणे साफ केल्या पाहिजेत.
१३. अंडी उत्पादन हे पक्षी दररोज मिळणाऱ्या प्रकाशाची लांबी आणि तीव्रतेशी संबंधित आहे. पावसाळ्यात दिवसाची लांबी कमी होते. फॉलिकल-उत्तेजक संप्रेरक (FSH) आणि ल्युटेनिझिंग हार्मोन (LH) सोडण्यासाठी प्रकाश ऑप्टिक नर्व्हद्वारे पिट्यूटरी ग्रंथीच्या पूर्ववर्ती लोबला उत्तेजित करतो. FSH हे ओवरी च्या फोलीकॅल ची वाढ वाढवते. परिपक्वता झाल्यावर, ल्युटेनिझिंग हार्मोन क्रियेद्वारे बीजांड सोडले जाते. वाढीच्या अवस्थेत आणि उत्पादन सुरू करताना पक्ष्यांना खराब उत्तेजनाच्या आव्हानाचा सामना करावा लागतो ज्यामुळे उत्पादनास उशीर होतो. प्रकाश वेळेवर पक्ष्यांना उत्तेजित करतो; उत्तेजित होण्यास उशीर केल्याने पक्षी उत्पादनात येण्यास उशीर होईल. त्याकरिता, गलिच्छ बल्ब स्वच्छ केले पाहिजे कारण ते चमक कमी करतात.
१४. पावसाळ्यात, सापेक्ष आर्द्रता जास्त असल्याने, उष्णतेचा ताण अनुभवणारे पक्षी खाद्याचे सेवन कमी करतात. जीवनसत्त्वे आणि ट्रेस मिनरल्स प्रिमिक्ससह, कमी झालेल्या खाद्याच्या सेवनानुसार सर्व पोषक घटकांचे पुनर्रचना करून खाद्य पक्ष्यास द्यावे .
१५. पावसामुळे ब्रूडिंगच्या परिस्थितीवर परिणाम होतो आणि वेंटिलेशनच्या कमतरतेमुळे शेडमध्ये अमोनियाची पातळी वाढते. शेडचे तापमान आणि आर्द्रता यांचे वारंवार निरीक्षण करावे आणि लहान पिलांची दर्जेदार काळजी करण्यासाठी योग्य तापमानद्यावे (९५० फेरानाईट पहिल्या आठवड्यात). शेडच्या आत अमोनिया जमा होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजूच्या पडद्याची उंची योग्य ठेवावी .
१६. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात ग्रोवर पक्ष्यांचे (तलंग) वजन कमी असते आणि त्यांना संतुलित आहार आणि पुरेसे जागा न दिल्यास त्यांचे वजन कमी असते. कमी शरीराचे वजन आणि ग्रोवर एकसारखेपणा नसल्याने अंडी देणाऱ्या पक्ष्यांचे उत्पादन सुरू होण्यास उशीर होण्याची शक्यता असते. शिवाय, उत्पादन वाढीदरम्यान वाढत्या पोषक गरजा पूर्ण करण्यासाठी खाद्याचे सेवन पुरेसे असू शकत नाही. या कालावधीत पुरेशा प्रमाणात पोषक आहार आणि उत्पादनास समर्थन देण्यासाठी पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्री-पीक आहार प्रदान करणे खूप महत्वाचे आहे.
१७. पावसाळ्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्याची गुरुकिल्ली म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी योग्य व्यवस्थापन आणि पक्ष्यांना लागणारे घटक यांची परिक्षण करणे व खाद्यातील पौष्टिक उपायांचा अंदाज घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे.
– लेखनः- डॉ. एम.आर. वडे, सहाय्यक प्राध्यापक,
कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.)