अकोला दि.15: ‘जलशक्ती अभियानाअंतर्गत पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरविण्यासाठी राबवावयाच्या जलपुनर्भरण उपाययोजना अंमलात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची सज्जता आहे,असा विश्वास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज केंद्रीय पथकास दिला.
‘जलशक्ती अभियानः कॅच दि रेन’, या अभियानाचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाने दोन दिवस केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आज आढावा बैठक घेतली व आपली निरीक्षणे नोंदविली. या पथकात केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय विभाग नवी दिल्लीचे संचालक प्रशांत अग्रवाल व केंद्रीय जल, उर्जा व संशोधन संस्था पूणेचे वैज्ञानिक भुषण तायडे या दोन तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, शिक्षणाधिकारी(प्राथ.) वैशाली ठग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, वरिष्ठ भूवैज्ञानिक एन. बी. इंगळे, जलसंधारण अधिकारी संजय कुंभारे, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी डी.एन. मडावी, पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता पी. पी. घुगे, सहा वनसंरक्षक सु. अ. वडोदे आदी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील कामांची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील कामगिरी चांगली असल्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात काही उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशी सुचना केली. त्यात प्रामुख्याने पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण, जलपुनर्भरणाच्या विविध उपायांचा अवलंब करणे, रिचार्ज शाफ्ट सारख्या उपाययोजना आणखी वाढवणे, भुजल अधिनियमाचे काटेकोर पालन करणे इ.
केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील यंत्रणांकडून जलशक्ती अभियानासंदर्भात सुचना व अनुभव विचारले. त्यात जिल्हाधिकारी अरोरा यांनी जिल्ह्यात जलशक्ती अभियानातंर्गत झालेली व नव्याने होत असलेल्या कामांची माहिती देऊन त्यात अंमलबजावणीसाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील खारपाण पट्टा क्षेत्रात जलसंधारणासाठी तज्ज्ञांद्वारे प्रभावी उपाययोजना सुचविण्यात यावी, अशी सुचनाही त्यांनी केली. जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये जलसंधारण उपाययोजना राबवून त्या क्षेत्रात पडणारा सर्व पाऊस त्याच क्षेत्रात जिरवला गेला पाहिजे; यासाठी प्रभावी उपाययोजना वनविभाग राबवित असल्याची माहिती सहा. वनसंरक्षक वडोदे यांनी दिली. तर जिल्ह्यात नाल्यांमध्ये रिचार्ज शाफ्ट सारखी उपाययोजना प्रभावी ठरल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक इंगळे यांनी सांगितले. जिल्ह्यात जलसंधारण कामे करण्यासाठी मनरेगासारख्या योजनेशी समायोजन करुन कामे करण्यास अधिक वाव असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी सांगितले. नागरी वस्त्यांमध्ये होत असलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग व अन्य उपाययोजनांबाबत मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी माहिती दिली.