भारतीय शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी पावसाळ्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो. पावसाळ्यात माळरानावर व चराऊ क्षेत्रावर नवीन गवत उगवते, नदी नाल्यांना भरपूर पूर-पाणी येत असते. जनावरे माळरानावर उगवलेल्या नवीन हिरवे गवतावर चरत असतात व नदी नाल्यातील दूषित पाणी पितात. त्याद्वारे विविध रोगाचे जंतू जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे विविध रोगांना बळी पडतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात जनावरांची विशेष काळजी व योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे असते. शेतकऱ्यांना व गोपालकांना पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या रोगांबद्दलची माहिती देऊन त्यांच्यात जागरूकता करणे गरजेचे आहे, पावसाळ्याच्या दिवसात मुख्यतः खालील रोग जनावरांना होत असतात.
१) घटसर्प : संसर्गजन्य रोग असून गाई, म्हैस, शेळी, मेंढी या जनावरात होतो. हा रोग पाश्चुरेला मल्टीसीडा नावाच्या जीवाणूमुळे होतो. हवामानात तीव्र बदल झाल्यास,असंतुलित आहार दिल्यास किंवा जनावरांना लांब वाहुन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले तर या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. या रोगाचा प्रसार दूषित चारा, पाण्यामार्फत होतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली की शरीरात या रोगाच्या जीवाणूंची संख्या वाढते व ते श्वासनलिकेत व फुफ्फुसामध्ये जातात व हे जीवाणू आजारी जनावराच्या नाकातून वाहणाऱ्या स्त्रावातून रोगाचा प्रसार करतात.
लक्षणे : जनावराचे शारीरिक तापमान वाढते, जनावर खात पित नाही.नाकातून व तोंडातून स्त्राव वाहतो. घशाला सूज येते व जनावराला श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो.डोळे लाल होतात. जनावर थरथर कापते व दगावते.
प्रतिबंधक उपाय : बाधीत जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. दूषित अन्न, पाणी व बाधीत मृत जनावरांना पुरून किंवा जाळून योग्य विल्हेवाट लावावी. बाधीत जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतूकीकरण करावे आणि पावसाळ्यापूर्वी घटसर्प प्रतिबंधक लसीकरण करावे.
२) फऱ्या/ एक टांग्या : हा संसर्गजन्य रोग असून गाई, म्हैस, शेळी, मेंढी या जनावरात आढळतो. हा रोग मुख्यतः लहान वयाच्या जनावरांमध्ये आढळतो. हा रोग क्लोस्ट्रिडियम चोव्हिया नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार दूषित अन्न व दूषित जखमांतून होतो. जिथे पाणी साचते, दलदल असते अशा ठिकाणी चरणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळतो.
लक्षणे : आजारी जनावराला खूप ताप येतो, जनावराच्या मागच्या पुठ्यावर व खांद्यावर सूज येते व या ठिकाणी दाबले असता करकर असा आवाज येतो, जनावराचे पाय लुळे होवून चालतांना जनावर लंगडते, वेळीच उपाय न केल्यास जनावर दगावते.
प्रतिबंधक उपाय: बाधीत जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे तसेच बाधीत क्षेत्रामध्ये जनावरांना चरायला सोडू नये. बाधीत मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी. पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लसीकरण करावे. स्वच्छता ठेवावी. बसलेल्या जनावरांना उभे करून त्यांना चालविण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांची कुस बदलावी.
३) जनावरातील हगवण: हा रोग गाई-म्हशींना टोगा व्हायरीडी या गटाच्या विषाणू मुळे होत असून ६ ते २४ महिने वयाची जनावरे या रोगाला मुख्यतः बळी पडत असतात, या रोगाचे विषाणू बाधीत जनावराच्या डोळे, नाक व तोंडातील स्त्रावाच्या संपर्कात आल्यामुळे निरोगी जनावरात पसरतो.
लक्षणे : या रोगामध्ये जनावराला ४ ते ७ दिवस खूप ताप राहतो. सुरूवातीला जनावरांच्या नाकातून घट्ट स्त्राव वाहतो, नंतर कोरडा खोकला येतो, जनावराला हगवण लागते, त्यामध्ये चिकट द्रव व रक्त दिसून येते. जिभेवर, टाळूवर व हिरड्यांवर क्षती दिसून येतात व त्यामुळे जनावरे लाळ गाळतात.
प्रतिबंधक उपाय : गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केल्यास या रोगाचा प्रसार थांबवता येतो. बाधीत जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
४) पिपऱ्या/पी.पी.आर. : हा एक शेळ्यांमधील महत्वाचा विषाणू जन्य साथीचा रोग असून मॉरबीली गटाच्या विषाणूंमुळे होतो. या रोगाला शेळ्यांचा प्लेग असेही म्हणतात.
लक्षणे : शेळ्यांना अचानक ताप येतो, नाकातून व डोळ्यातून पातळ स्त्राव वाहतो, जनावर सतत शिकत राहते. तोंडाच्या आतील भागाला जीभेला, हिरड्यांना व खालच्या ओठांवर पुरळं येतात त्यामुळे बाधीत शेळ्यांना खाता येत नाही. बाधीत शेळ्यांना काळ्या रंगाची हगवण लागते. गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो. मरतुकीचे प्रमाण ३० टक्के असून ५ ते ६ दिवसात रोगग्रस्त शेळी मरण पावते.
प्रतिबंधक उपाय : या रोगास प्रतिबंध न घालण्याकरिता सर्व शेळ्यांना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
५) सरा : पावसाळ्याच्या दिवसात हवामान दमट झाल्यामुळे डास, माशा व इतर कीटक यांची संख्या वाढते व यांच्या चावल्यामुळे या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये होतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा व उंट यामध्ये आढळते. ट्रीपॅनोसोमा इव्हान्साय या एक पेशीय जंतूमुळे हा रोग होतो. या जंतुचा प्रसारमुख्यतः टॅबनस जातीच्यामाशाचावल्यामुळे होतो.
लक्षणे : खूप ताप येते, जनावरे गोल गोल फिरतात, कठिण वस्तुवर डोके घासतात, भुक मंदावते, दुध उत्पादन कमी होते, वजन कमी होते व वेळेवर उपचार न केल्यास जनावर मृत्यू पावतो.
प्रतिबंधक उपाय : हा रोग उपचार केल्यास पूर्णपणे बरा होतो. या रोगाचा प्रसार करणा-या कीटकांच्या वाढीवर कीटकनाशकाची फवारणी करून प्रतिबंधक करावा. बाधीत जनावरांना वेगळे बांधावे व गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी.
६) थायलेरिओसिस : हा रोग संकरीत जनावरांमध्ये व वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या रोगाचा प्रसार पिसवे चावल्यामुळेघ होतो. हा रोग थायलेरिया अनुलाटा या ना एक पेशीय जंतुमुळे होतो.
लक्षणे : या रोगात जनावरांना खूप ताप येतो व त्यामुळे जनावर बापायला लागते. लिम्फनोड आकाराने वाढतात व त्यांच्यावर सुज येते. जनावरांचे डोळे पिवळसर दिसतात व लघवी तपकिरी या रंगाची होते. शरिरातील रक्त कमी होऊन जनावर अशक्त होते. डोळ्यातून व नाकातून पाणी वाहते, योग्य उपचार न केल्यास जनावर ७ ते १० दिवसात मरण पावते.
प्रतिबंधक उपाय : जनावरांच्या गोठ्यामध्ये व परिसरात नियमितपणे किटकनाशकाची फवारणी करावी. या रोगाचे रक्षा व्हॅक टी नावाच्या लसीने लसीकरण करून प्रतिबंध करता येते.
७) बॅबेसिओसिस : हा रोग बॅबेसिया बायजेमीना किंवा बॅबेसिया बोव्हीस या एक पेशीय जंतुमुळे होतो व प्रसार पिसके चावल्यामुळे होतो. संकरीत जनावरांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.
लक्षणे : जनावराला ताप येते व हृदयाचे न ठोके वाढतात. भुक मंदावते, जनावर अशक्त होते, दुध उत्पादन कमी होते. या रोगात बाधीत जनावराच्या लघवीचा रंग कॉफी सारखा असतो.
प्रतिबंधक उपाय : योग्य उपाचार केल्यास बाधीत जनावर लवकर बरा होतो. जनावराच्या शरीरावर, गोठ्याची व परिसराची कीटकनाशकाने फवारणी करून पिसवांचा नायनाट करावा.
लेखनः- डॉ. प्राजक्ता कुरळकर, डॉ. शैलेंद्र कुरळकर
स्नातकोत्तर पशुवैद्यकिय व पशुविज्ञान संस्था, अकोला
(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.)