पिंपरी : शाळंच्या उन्हाळी सुट्या संपण्यास दोन आठवड्यांचा कालावधी राहिला आहे. 13 जूननंतर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागाच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. मात्र, कोरोना अद्याप संपलेला नाही तसेच मुलांचे शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. त्यादृष्टीने सुरक्षिततेच्या उपयायोजनांचे नियोजन शहरातील शाळांमध्ये सुरी झाले आहे.
गेली दोन वर्षे शैक्षणिक वर्षे ऑनलाईन सुरु होते. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरु होतात. यंदा शाळा 13 जून रोजी सुरु होत असल्याने शाळांमध्ये पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. गेले दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळांमध्ये डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे नवागतांचे स्वागत तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी कशी करायची, याबाबत बैठका सुरु आहेत. मुख्याध्यापकांना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या साठीही मार्गदर्शक सुचना कराव्या लागणार आहेत. यासाठी शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील मनपा आणि खासगी शाळांचे नियोजन सुरु आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा सुरु होणार पण विद्यार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्व शाळा विद्यार्थ्यांची काळजी घेण्याच्या उपाययोजनांमध्ये गुंतल्या आहेत. शाळांना शासनाकडून अजून कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. तरीदेखील ऐनवेळी घाई गडबड होवू नये यासाठी शाळा जुन्या नियमावलीनुसार पूर्वतयारी करत आहेत. यानंतर शासनानकडून सर्व शाळांना जी नियमावली येईल त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका शाळा सुरु करताना कशा प्रकारचे नियोजन असावे यासाठी प्रसर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. शाळांमध्ये प्रवेश करताना थर्मल स्कॅनिंग, मास्क आणि सॅनिटायजर आवश्यक असणार आहे. आजारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत न येता घरीच थांबावे. स्वच्छतागृहामध्ये सॅनिटायजर, हात धुण्यासाठी हॅण्डवॉश किंवा साबण, नियमित पाणीपुरवठा आणि स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी ताट व ग्लास स्वच्छ ठेवणे. सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
खासगी शाळांतही यंदा शंभर टक्के उपस्थिती असेल. त्यामुळे शाळा सुरु करताना यावर्षीही पालकांकडून हमीपत्र भरून घेणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी स्कॅनिंग मशीन बसविण्यात येईल. मास्क अनिवार्य असेल, शाळेत सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक असेल, अशी माहिती श्रीमती गेंदीबाई चोपडा हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजचे प्राचार्य विक्रम काळे यांनी दिली.