अकोला,दि.1: जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने व पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून महिलांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचाराकरीता तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज(दि.1) अकोट ग्रामिण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबीरात 865 महिला रुग्णांचे 1 हजार 823 विविध आजरांची तपासणी करुन चाचण्या करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.
आरोग्य तपासणी शिबीरास महिलांना गावांतून आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदान व अनुषंगिक उपचार करण्यात आले. या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार, कर्करोग, रक्ताचे विकार, त्वचा विकार, किडनीचे आजार, हाडांचे विकार, दातांचे विकार या सह विविध आजारांवर उपचार करण्यात आले. त्यात 865 महिलांचे 1823 विविध आजारांची तपासणी करुन 30 रुग्णांची मोठया शस्त्रक्रिया व 81 रुग्णांची लहान शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या महिला रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील.
आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नोडल अधिकारी डॉ.मिना शिवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, डॉ.मनीष शर्मा, गटविकास अधिकारी किशोरजी शिंदे, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिनल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्वेता सालफळे, जिल्हा लसीकरण पर्यवेक्षक डा. मंगेश दातीर, दंत शल्य चिकित्सक डॉ.अनिल कापसे, डॉ.रुपाली गुजर, डॉ.आनंद परस्कार व ग्रामीण रुग्णालयाचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी आदि उपस्थित होते. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा क्रिएटीव्ह ग्रुपचे संचालिका रेखा चांडक यांच्यातर्फे महिला रुग्णांना जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय अकोट, नागरी आरोग्य केंद्र नंदिपेठ, औषण निर्माण अधिकारी, परिचारिका आदिनी शिबीराकरीता परिश्रम घेतले.