हिवरखेड(धीरज बजाज)- मागील 22 वर्षांपासून नगरपंचायत ची मागणी पूर्ण होत नसल्याने आता हिवरखेड वासियांच्या रक्ताच्या धारा वाहणार आहेत यासाठी सर्वसामान्य नागरिकांतर्फे रक्त संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.
विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी मागील 22 वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपंचायतची उद्घोषणा करण्यास विलंब करीत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने झाली.
परंतु शासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी आता हिवरखेड वासी यांनी रक्त संकल्प अभियान चालविला असून हिवरखेड नगरपंचायत साठी आणि हिवरखेड- तेल्हारा- आडसुल यासह प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आता हिवरखेड वासियांच्या रक्ताच्या धारा वाहणार आहेत. यासाठी हिवरखेडच्या सर्व जागरूक नागरिकांतर्फे आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत श्री महाराणा प्रताप जयंती निमित्त दिनांक 2 जून गुरुवारी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, मेडिकल चौक, हिवरखेड येथे रक्त संकल्प अभियान होणार असून यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे सुध्दा आयोजन केलेले आहे. ज्याच्या माध्यमातून शेकडो जणांचे अनमोल प्राण वाचविण्याचे पुण्यकर्म केले जाणार असून हा शासनाला गांधीगिरी मार्गाने संदेश दिला जाणार आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे.
याप्रसंगी डॉ बीपी ठाकरे ब्लड बँक तर्फे रक्त संकलित केले जाणार आहे. सोबतच हिवरखेड वासियांच्या रक्ताने मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, व इतर वरिष्ठांना रक्तरंजित पत्र लिहिण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जागरुक महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व हिवरखेड नगरपंचायत व रस्ता निर्मितीमध्ये आपला महत्त्वाचा वाटा नोंदवावा अशी विनंती करण्यात आली आहे. इच्छुक रक्तदात्यांनी आदर्श पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सोबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.