अकोला,दि.31:- पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेचा शुभारंभ आज(दि.30) नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्यांच्या पालनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्ह्यातील पाच अनाथ बालकांना प्रधानमंत्री मोदी यांचे स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्टाचे पासबुकचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा नियोजन सभागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल न्याय मंडळचे ॲड वैशाली गावंडे, ॲड. सारिका घिरणीकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अविनाश मुधोळकर, जिल्हा संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, चाईल्ड लाईनचे समन्वयक हर्षाली गजभिये, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, सुनिल लाडुलकर, सामाजिक कार्यकता सतिश राठोड, रेवत खाडे, संगिता अभ्यंकर आदि उपस्थित होते.
पीएम केअर फॉर चिल्ड्रन निधीतून प्रत्येकी 10 लक्ष रुपये मुदत ठेवीचे पोस्टाचे पासबुक देण्यात आले. हे पासबुक बालक आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त नावाने आहे. या खात्यामध्ये बालकांच्या वयानुसार त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे. ही रक्कम त्यांना वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आयुषमान भारत योजनेअंतर्गत या पाच बालकांचा प्रत्येकी पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा काढून त्या बालकांना आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या विम्याचा हप्ता पीएम केअर फंडातून भरण्यात येणार असून या कार्डवर पाच लाखपर्यंत मुक्त उपचार मिळणार आहे.