अकोला दि.25 – प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार पूर्वमान्सून व मान्सून कालावधीत विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी” ॲप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे GPS लोकेशनने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.
गावातील सर्व स्थानिक, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे .