केंद्र सरकार पाठोपाठ आता राज्यसरकानेही पेट्रोल 2 रूपये 80 पैसे, तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त केले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वाढती महागाई आणि वाढत्या इंधन दराने होरपळणाऱ्या जनतेला काल केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय काल घेतला. यापाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही याबाबत मोठा निर्णय आज घेतलेला आहे. त्याप्रमाणे पेट्रोल वरील अबकारी कर प्रती लिटर 2 रूपये 80 पैसे आणि डिझेल वरील अबकारी कर 1 रुपये 44 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.
या आधी इतर राज्यांनी किंवा भाजपशासीत राज्यांनी त्यांच्या येथील इंधन दर कमी केले होते. तेव्हा केंद्राने महाराष्ट्र सरकारला इंधनावरील अबकारी कर कमी करावे अशा सुचना केल्या होत्या. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याबाबतीत कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता केंद्राने अबकारी कर कमी केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने इंधनावरील कर कमी करुन राज्यातील जनतेला आणखी दिलासा दिलेला आहे.