पुणे : ‘सध्या मानवी जीवाला धोका असणार्या कामांमध्ये रोबोट्सचा (यंत्रमानव) वापर होत आहे. मात्र, भविष्यात सर्वच क्षेत्रात यंत्रमानवांचा वापर वाढणार आहे. त्यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज भासणार आहे, असे मत रोबोटिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रोबोट्चा उपयोग औद्योगिक कंपन्या, वैद्यकीय, लष्करी, कृषी, हॉटेल, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रातील विविध कामांमध्ये होत आहे. यात प्रामुख्याने आता वैद्यकीय क्षेत्रात फक्त शस्त्रक्रियेपुरता मर्यादित विचार न करता, दवाखान्यातील दैनंदिन कामे करतानासुद्धा यंत्रमानव मदत करू शकतो. माणसासारखी दिसणारी मशीन असा रोबोट्सचा असलेला चेहरा आता बदलत चालला आहे. हेरगिरी, टेहळणी आणि हल्ला, आक्रमण यापासून सुरू झालेला ड्रोनचा प्रवास, संरक्षण क्षेत्रात भूसुरुंगाचा शोध लावण्यासाठी प्रभावीपणे केला जात आहे.
त्याचबरोबर पिकांची पाहणी व त्यावरील रोगांची माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन उपयोगात आणले जात आहेत. संकटांमध्ये शोध आणि बचाव कार्य, विजेच्या तारांची पाहणी, अनधिकृत बांधकामांचे नियंत्रण, जमिनींचे सर्वेक्षण, भूस्खलन मोजणी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाच्या मार्गाची टेहळणी या नवीन क्षेत्रांमध्ये रोबोटिक्सचा वापर वाढत चालला आहे. यंत्र मानवांमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तव आणि मिश्रित वास्तव याचा वापर सुरू झाला आहे. जेणेकरून रोबोट मानवाप्रमाणेच निर्णय घेऊ शकणार आहेत. त्यामुळे येत्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात यंत्रमानव दिसणार असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्या कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यासाठीचे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे.