अकोला दि.22 : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या संदेशानुसार सोमवार दि. 25 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरीक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा स्थुलपणा, डोकदुखी, चक्कर येणे ही उष्माघात होण्याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. तसेच रविवार दि. 24 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजाच्या कडकडासह पाऊस व तासी 30 ते 40 कि.मी.या प्रमाणे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजांपासून बचावाच्या अनुषंगाने उपाययोजना याप्रमाणे:
वीज व वादळाच्या स्थिती जाणवताच टेलीव्हीजन, संगणक इ.उपकरणे बंद करुन स्त्रोतापासुन अलग करुन ठेवावेत. विज व वादळाच्या स्थितीमध्ये मोबाईल, दुरध्वनीचा वापर टाळावा, घरामध्ये असतांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. दारे, खिडक्या बंद करावीत, झाडाखाली आश्रय घेवू नये, वाहनावर प्रवास करीता असल्यास आपले वाहन विजेचे खांब व झाडाखाली थांबू नये.
विज पडल्यास मुख्यत: मानवी हृदय व श्वसन प्रक्रीयेत अडथळा येतो अशावेळी लगेच हृदयाजवळील भागाच्या परीसराला मालिश करुन तोंडाने श्वसन प्रक्रीयेस मदत करावी. उष्णेतेच्या लाट, वीज व वादळाच्या अनुषंगानी सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.